मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबवण्यात येणाऱ्या औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी. फार्मसी) अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीची निवड यादी सोमवारी जाहीर झाली. या यादीत ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवसांत प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचे आहेत.
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमध्ये २९ हजार १६६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. मात्र, प्रत्यक्ष प्रवेश घेणाऱ्यांची संख्या १६ हजार ६७० इतकीच राहिली. दुसऱ्या फेरीत ही संख्या निम्म्यावर आली आणि ८१३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या फेरीपूर्वी प्रथम वर्षासाठी प्रवेश बंदी घालण्यात आलेल्या १८ महाविद्यालयांपैकी १३ महाविद्यालयांवरील बंदी उठवण्यात आली. त्यामुळे सुमारे ८५० जागांची भर पडली होती.
तिसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर होण्यापूर्वी भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) उर्वरीत महाविद्यालयांवरील प्रवेश बंदीही मागे घेतल्याने तिसऱ्या फेरीतही जागा वाढल्या आहेत. तिसऱ्या फेरीतील यादीसाठी ४६ हजार १०९ जागा उपलब्ध असून तिसऱ्या फेरीनंतरही १४ हजार ८९ विद्यार्थी प्रवेशाविना राहणार आहेत. तिसऱ्या फेरीत ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट करण्यात आली.
३० सप्टेंबरपर्यंत सुरू होती मान्यता प्रक्रिया
औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना दरवर्षी पीसीआयकडून मान्यता घ्यावी लागते. या प्रक्रियेला यंदा ३० सप्टेंबरपर्यंत विलंब झाल्याने पदवी बी. फार्मसी आणि डी. फार्मसी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जवळपास चार महिन्यांहून अधिक प्रतीक्षा करावी लागली.
