लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर करण्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा २२ ते ३० एप्रिल, तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी ७ लाख २५ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. या विद्यार्थ्यांमध्ये ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी पीसीएम या गटातून, तर पीसीबी या गटातून ३ लाख १४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

आणखी वाचा-पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम तूर्तास स्थगित

जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याची माहिती आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली. या परीक्षेची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीवर प्रसिद्ध केली आहे. पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांना २४ मेपर्यंत आक्षेप नोंदवता येईल. तर पीसीएम ग्रुपच्या विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत आक्षेप नोंदवता येईल.