राज्यात अनेक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता
मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे प्रभावी क्षेत्र तयार झाले असून, त्या परिसरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पुढील दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याशिवाय शुक्रवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, अहमदनगर, हिंगोली, नांदेड, लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्य़ांत गडगडाटसह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत गुरुवारी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह, विजा चमकून मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गडगडाटी पाऊस पडू शकतो.
पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मान्सूनोत्तर पाऊस राज्यात अनेक ठिकाणी पडत आहे. बुधवारी चिखलठाणा आणि सांगली येथे पावसाने हजेरी लावली होती.
तर सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी रात्री नऊ वाजल्यानंतर मुंबईत पावसाने हजेरी लावली. फोर्ट, कुलाबा, मरिन ड्राईव्ह, वरळी, परळ आणि दादरमध्ये १० ते २० मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.
