मुंबई : राज्य सरकारने म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेतील अनुज्ञेय चटई क्षेत्रफळाबरोबरच नियमातही बदल केले आहेत. त्यानुसार आता मध्यम गटासाठी १६० चौरस मीटरऐवजी ९० चौरस मीटर, तर उच्च गटासाठी २०० चौरस मीटरऐवजी ९० चौरस मीटरवरील क्षेत्रफळ अनुज्ञेय असणार आहे. त्याचवेळी आता नवीन बदलानुसार अत्यल्प गटातील व्यक्तीला केवळ अत्यल्प आणि अल्प गटातील घरासाठी अर्ज करता येणार आहे. यापूर्वी अत्यल्प गटातील अर्जदारांना अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटातील घरासाठी अर्ज करता येत होता. आता अत्यल्प गटातील व्यक्तींना उच्च, तसेच मध्यम गटातील घरासाठी अर्ज करता येणार नाही. तर अल्प गट उच्च गटासाठी अर्ज करू शकणार नाही. यासाठीचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अत्यल्प गटातील घरांच्या किमती आणि उत्पन्न यात तफावत असल्याने अनेकांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे ही तफावत दूर करण्यासाठी उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा निर्णय २०२२ मध्ये घेण्यात आला. पुढील पाच, दहा वर्षांतील उत्पन्न वाढीचा विचार करून उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आली. दोन वेळा उत्पन्न मर्यादा बदलण्यात आली. शेवटच्या बदलानुसार अत्यल्प गटातील व्यक्तीला अत्यल्प गटासह अल्प, मध्यम आणि उच्च गटातील घरासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली. तर अल्प गटातील व्यक्तीला अल्प, मध्यम आणि उच्च, मध्यम गटातील व्यक्तीला मध्यम तसेच उच्च गटातील घरासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली. त्याच वेळी उच्च गटातील व्यक्तींना केवळ आणि केवळ उच्च गटातील घरासाठीच अर्ज करण्याची मुभा होती. पण आता सरकारने पुन्हा एकदा या नियमात बदल केला आहे.

नव्या शासन निर्णयानुसार आता अत्यल्प गटातील व्यक्तीला केवळ अत्यल्प आणि अल्प गटातील घरांसाठीच अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत या गटातील व्यक्तीला मध्यम आणि उच्च गटातील घरासाठी अर्ज करता येत होता. त्याच वेळी अल्प गटातील व्यक्तीला आता केवळ अल्प आणि मध्यम गटातील घरासाठीच अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत या गटातील व्यक्तीला उच्च गटातील घरासाठी अर्ज करता येत होता. मध्यम आणि उच्च गटासाठीच्या नियमात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मध्यम गटातील व्यक्तीला मध्यम आणि उच्च गटातील घरासाठी अर्ज करता येणार आहे. तर उच्च गटाला उत्पनाची कमाल मर्यादा नसून हा गट केवळ उच्च गटातील घरासाठीच अर्ज करू शकणार आहे.

नवीन शासन निर्णय

  • अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
  • अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
  • मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
  • उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

पूर्वीचा शासन निर्णय

  • अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
  • अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
  • मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
  • उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतात.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change in rules regarding income limit for mhada draw ssb