|| समीर कर्णुक
दीड हजार चालकांवर कारवाई
मुंबई: शहरातील विविध टर्मिनस परिसरांत गेल्या काही दिवसांपासून बेशिस्त वाहनचालकांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्याची दखल घेऊन रेल्वे पोलिसांनी पुन्हा एकदा वाहतूक शाखा सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत नव्या वर्षातील पहिल्या पाच दिवसांत दीड हजार वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून साडेसात लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. मात्र या ठिकाणी असलेल्या टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनचालकांकडून प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत रेल्वे पोलिसांकडे अनेक तक्रारी गेल्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी १५ वर्षे बंद असलेली रेल्वेची वाहतूक शाखा पुन्हा १७ नोव्हेंबर २०२१ ला सुरू केली. सध्या या वाहतूक शाखांची पूर्ण जबाबदारी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्याकडे आहे.
त्यानुसार सध्या या सर्व टर्मिनसबाहेर रेल्वेचे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचे काम रेल्वेच्या वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. तसेच नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून वाहतूक पोलीस त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंडदेखील वसूल करत आहेत. नवीन वर्षात रेल्वे वाहतूक पोलिसांनी ही कारवाई अधिकच कडक केली आहे. त्यानुसार गेल्या पाच दिवसांत म्हणजे बुधवारपर्यंत पोलिसांनी १ हजार ४२८ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून सात लाख ५४ हजार सहाशे रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, पट्टा न लावणे, गणवेश परिधान न करणे, हेल्मेट न घालणे, रंगीत काचा लावणे, रांगेत उभे न राहणे, नंबर प्लेट चुकीची लावणे, अस्वच्छ वाहन, विरुद्ध दिशेने येणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे आणि अधिक प्रवासी बसवणे आदी कारवाईचा समावेश आहे.