मुंबई : खोकल्यावरील औषध ‘कोल्ड्रिफ’मुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काही बालकांचा मृत्यू झाला होता. यानंतर केलेल्या तपासणीत या औषधामध्ये डायइथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक मिसळल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या औषधाचा वापर तत्काळ थांबवावा, तसेच कोणाकडे हे औषध असल्यास त्यांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाला कळवावे, असे आवाहन राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
तामिळनाडूमधील मे. सेसन फार्मा ही औषध कंपनी ‘कोल्ड्रिफ सिरप’ या औषधाची निर्मिती करते. या औषधाच्या सेवनाने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मे २०२५ रोजी निर्मिती केलेल्या आणि एप्रिल २०२७ रोजी कालावधी संपुष्टात येणाऱ्या औषधाच्या बॅच क्रमांक एस आर १३ मधील साठ्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये औषधामध्ये डायइथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक मिसळल्याचे स्पष्ट झाले.
राज्यात वितरण झालेल्या या औषधाच्या साठ्याबाबत कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधला आणि या उत्पादनाच्या महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहे. राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालये यांना औषधाच्या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता, तो साठा गोठवावा अशा सूचना सर्व औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्तांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि धोका टाळावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन औषध नियंत्रक दा. रा. गहाणे यांनी केले आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
राज्यातील नागरिकांनी तत्काळ ‘कोल्ड्रिफ’ औषधाचा वापर थांबवावा. हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल, तर ते जवळच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास ichq.fda-mah@nic.in या इ-मेलवर किंवा मदत क्रमांक १८०० २२२ ३६५ आणि मोबाइल क्रमांक ९८९२८३२२८९ वर त्वरित कळवावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना केले आहे.