सीआयडीकडून सलग दुसऱ्या दिवशी परमबीर सिंह यांची चौकशी ; तीन गुन्ह्यांमधील चौकशी प्रक्रिया पूर्ण

डी परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल दोन खंडणीच्या गुन्ह्यांसह तीन गुन्ह्यांचा तपास करत आहे.

मुंबई: राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांची ठाण्यातील कोपरी प्रकरणात मंगळवारी चौकशी केली. सीआयडीकडे सिंह यांच्याविरोधात दाखल तिन्ही प्रकरणांमध्ये सिंह यांचा जबाब नोंदविण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना ६ डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. सलग दोन दिवस सिंह यांची चौकशी करण्यात आली.

सीआयडी परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल दोन खंडणीच्या गुन्ह्यांसह तीन गुन्ह्यांचा तपास करत आहे. तिसरा गुन्हा हा  अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गंभीर कलमांतर्गत  दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांच्या तक्रारीवरून कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी परमबीर सिंहसह इतर व्यक्ती व अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला होता.  याप्रकरणी जूनमध्येच सिंह यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

परमबीर सिंह यांच्याविरोधातील खंडणीच्या दोन गुन्ह्यांमध्ये सीआयडी तपास करत आहे.  श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अनिल देशमुख-सचिन वाझे आयोगासमोर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील भेटीवरुन गोंधळ उडाला आहे. त्यातच मंगळवारी वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट झाली. माजी न्यायामूर्ती चांदीवाल यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी होती. या सुनावणीसाठी सचिन वाझे आणि अनिल देशमुख आले होते.  सचिन वाझे आयोगासमोर अनिल देशमुख यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी आयोगाकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.  ‘आपण असे करु नका, माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका, असे आयोगाने सचिन वाझेंना सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cid interrogates param bir singh for second day in a row zws

Next Story
भारताच्या बुद्धिबळातील प्रगतीचा पट ; ‘सहज बोलता बोलता’मध्ये ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याच्याशी आज वेबसंवाद
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी