CJI Bhushan Gavai says Studying in Mother Tongue Build Strong Values : महाराष्ट्रात हिंदी भाषा शिकण्याच्या सक्तीविरोधात राज्यातील जनता एकवटली आहे. मुलांना मातृभाषेतच शिक्षण दिलं जावं ही पालकांची, शिक्षणतज्ज्ञांची मागणी आहे. दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आहे. त्यांनी यासाठी स्वतःचं उदाहरण दिलं. गवई यांनी रविवारी (६ जुलै) मुंबईतील गिरगाव येथील त्यांच्या जुन्या शाळेत आयोजित सत्कार समारंभात बोलताना सांगितलं की मातृभाषेत शिक्षण घेतल्याने त्यांना आयुष्यभर फायदा झाला. ते म्हणाले, “यामुळे मुलांमध्ये मूल्ये रुजवणं सोपं होतं. मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतल्याने माझे पाय कायम जमिनीवर राहिले.”
भूषण गवई यांनी रविवारी सकाळी गिरगावमधील चिकित्सक समूहाच्या शिरोडकर शाळेला भेट दिली. याच शाळेत त्यांनी त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतलं आहे. यासह त्यांनी अमरावती येथील महानगरपालिकेच्या शाळेत व मुंबईतील कुलाबा येथील एका शाळेत शिक्षण घेतलं आहे. रविवारी शिरोडकर शाळेत आयोजित सत्कार समारंभात त्यांनी या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व त्यांच्या जुन्या वर्गमित्रांशी संवाद साधला. यावेळी त्यानी सांगितलं की शाळेत जाण्यासाठी त्यांची आई त्यांना दररोज २० पैसे देत होती. या पैशाचं ते बेस्ट बसचं तिकीट काढून शाळेत जात.
अन् सरन्यायाधीशांनी मराठीतून भाषण केलं
सत्कार समारंभाला संबोधित करताना न्यायमूर्ती म्हणाले, “मी मराठीतून बोलू की इंग्रजीत याबद्दल थोडा गोंधळलो आहे. मी मराठीतच बोलू का? सर्वांना समजेल ना? ठीक आहे. मी मराठीतच बोलतो. सध्या महाराष्ट्रात सध्या तेच चालू आहे.” असं म्हणून त्यांनी उर्वरित भाषण मराठीतूनच केलं.
राज्यातील फडणवीस सरकारने इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा शिकण्याची सक्ती केली होती. त्याविरोधात राज्यातील मराठी जनता एकवटल्यानंतर फडणवीस सरकारने माघार घेत हा निर्णय रद्द केला. परंतु, सरकारच्या या कृतीमुळे सध्या राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद चालू आहे. या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे.
मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे आपली मूल्ये मजबूत होतात : सरन्यायाधीश
न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, “मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे माझ्या शिक्षणात, कामात कधीच कुठलाही अडथळा आला नाही. आज मी ज्या पदावर पोहोचलो आहे, जी पदं भूषवली आहेत त्यामध्ये माझ्या शाळेचं व शिक्षकांचं मोठं योगदान आहे. मला मिळालेलं शिक्षण व मूल्यांमुळे माझ्या जीवनाला दिशा मिळाली. मातृभाषेत शिक्षण घेतल्याने विषयांची समज चांगली होण्यास मदत होते. आपली मूल्ये मजबूत होतात आणि आयुष्यभर ती आपल्याबरोबर राहतात.”