मुंबई : राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. सध्या विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरत आहेत. परंतु दहावीचा निकाल जाहीर होऊनही उर्वरित प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही गोंधळात पडले आहेत. आता बुधवार, ५ जूनपासून महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. तसेच उर्वरित प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.

दरवर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वीची प्रवेश क्षमता वाढ आणि शासनाकडून नवीन महाविद्यालयांना मंजुरी देण्यात येते. या सर्व महाविद्यालयांना केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व जागा आणि नवीन महाविद्यालयांची नोंदणी ही ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यानंतर ५ जूनपासून महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येईल. तसेच उर्वरित प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ११ वीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा…मध्य रेल्वेवरील ९३० लोकल फेऱ्या रद्द, ३३ लाख प्रवाशांचे अतोनात हाल; ठाण्याला ६३ तासांचा, सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक

दरम्यान, आतापर्यंत मुंबई महानगरक्षेत्रातील १ लाख ३३ हजार २९२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्जाचा भाग १ भरून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७९ हजार ४८१ विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात (लॉक) आले आहेत. तर ३८ हजार ३८८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित (ऑटो व्हेरिफाय) आणि २३ हजार ७५५ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी ही मार्गदर्शन केंद्रावर (जीसी व्हेरिफाय) झाली आहे.

हेही वाचा…पुणे अपघात प्रकरण : समितीचा अहवाल सादर; डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांचे निलंबन तर डॉ. विनायक काळे यांना सक्तीची रजा

ऑनलाइन अर्ज भरण्याचे टप्पे कसे?

विद्यार्थ्यांनी आपले शहर निवडून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करून लॉग इन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून झाल्यानंतर आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ हा ५ जूनपासून भरता येईल. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने निवडावी लागतील.