प्रेयसीबद्दल टिप्पणी केली म्हणून आरोपीने अडकवले खोट्या गुन्ह्यात

मुंबईः ‘सडक २’ आणि ‘बाटला हाऊस’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री क्रिसन परेराचा मुंबईत परतण्याचा मार्ग मोकळा झाला असताना आरोपीने क्रिसेनप्रमाणे अंमलीपदार्थांच्या खोट्या गुन्ह्यांत अडकवलेल्या क्लेटन रॉड्रीक्सला मात्र शारजामध्ये २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शारजातील स्थानिक न्यायालयाने नुकतीय क्लेटनला शिक्षा सुनावली असून केंद्र सरकारच्या मदतीने कुटुंबिय लवकरच शिक्षेविरोधात अपिल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई लोकलमध्ये तरुणीचा बलात्कार करणाऱ्या नवाझु करीमचा Video आला समोर, त्याच सकाळी ५ मुलींना…

आंतरराष्ट्रीय वेब सिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली अभिनेत्री क्रिसन परेराला शारजाला पाठवून अंमलीपदार्थांच्या गुन्ह्यात अडकवल्यात आले होते. तिला शारजामध्ये अटक झाल्यानंतर क्रिसनच्या आई-वडिलांनी वाकोला पोलिसांकडे तक्रार केली. वाकोला पोलिसांनी राजेश दामोदर बोभाटे ऊर्फ रवी ऊर्फ प्रसादराव (४२) व ॲन्थोनी ॲलेक्स पॉल (३४) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी शारजामधून क्रिसनला सोडवण्यासाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या कक्ष-१० च्या पोलिसांनी राजेश व पॉल या दोघांना अटक केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपींना अटक करून तात्काळ केंद्र सरकार मार्फत शारजातील स्थानिक यंत्रणांना याबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे क्रिसनच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

चौकशीत आरोपीने क्रिसनप्रमाणे ऋषीकेश पांड्या, केन रॉड्रीक्स, क्लेटन रॉड्रीक्स व मोनिशा डिमेलो यांनाही परदेशात पाठवले होते. त्यातील क्रिसन व क्लेटन रॉड्रीक्स यांना शारजा पोलिसांनी अटक केली. या सर्वांच्या कुटुंबियांसोबत पॉलचा वाद झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्याने या सर्वांना शारजाला पाठवून तस्करीच्या प्रकरणात अडकवले. क्लेटनने पॉलच्या प्रेयसीबद्दल टिप्पणी केली होती. त्याच्या रागातून त्याने क्लेटनलाही अंमलीपदार्थाच्या तस्करीप्रकरणी शारजामध्ये अडकवले होते. क्रिसनपूर्वी शारजाला गेलेला क्लेटन रॉड्रीक्स अद्याप तेथील कोठडीत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतीच शारजामधील स्थानिक न्यायालायने त्याला २५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा >>> मुंबईत चालत्या रिक्षात वाद झाल्याने महिलेची गळा चिरुन हत्या; पसार आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

क्लेटन व्यवसायाने डिस्क जॉकी(डीजे) आहे. क्लेटन त्याच्या पत्नीसह आरोपी ॲन्थोनीच्या वर्जेश्वरी येथील फार्महाऊसवर गेले होते. त्यावेळी ॲन्थोनीच्या प्रेयसीबाबत क्लेटनने बदनामीकारक टिप्पणी केली होती. त्यावरून ॲन्थोनी नाराज झाला होता. ॲन्थोनीनेे चार-पाचवेळा बोलताना त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. त्यानंतर यावर्षाच्या जानेवारी महिन्यात क्लेटनला प्रसाद राव नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी आला होता. त्याने फेब्रुवारीमध्ये त्याला परदेशात कामाला पाठवले. सोबत जाताना त्याने एक केक सोबत पाठवला होता. त्यात अंमलीपदार्थ सापडले होते. याप्रकरणी आता क्रिसेनप्रकरणातील आरोपपत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी गुन्हे शाखा प्रयत्नशील आहे. याशिवाय कुटुंबिय शारजा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपिल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clayton rodrigues sentenced to 25 years in jail in narcotics case in sharjah mumbai print news zws