मुंबई : मोबाइलवर रमी खेळत असल्याची समोर आलेली चित्रफीत तसेच भिकारी सरकार असा उल्लेख करणारे माणिकराव कोकाटे यांचे कृषिखाते काढून घेण्यास भाग पाडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचक इशारा दिला आहे.
शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कारभारावरून भाजपमध्ये तीव्र नापसंती आहे. कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याची चित्रफीत समोर आल्यापासून त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात येत होती. कोकाटे यांनी भिकारी सरकार हा केलेला उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांना फारसा रुचला नव्हता. त्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी होती. तसेच त्यांना कृषिमंत्रिपदी कायम ठेवण्याबाबत प्रतिकूल मत व्यक्त केले होते, असे सांगण्यात येते. यातूनच अजित पवार यांनीही कोकाटेंचे मंत्रिपद कायम ठेवले असले तरी त्यांच्याकडील कृषी हे खाते काढून घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कठोर भूमिकेमुळेच अजित पवारांचाही नाईलाज झाल्याचे समजते.
गैरकृत्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे पांघरूण, भाजपचा आक्षेप
शिवसेना मंत्र्यांच्या उद्योगांमुळेही मुख्यमंत्री हैराण झाल्याचे समजते. संजय शिरसाट, संजय राठोड, योगेश कदम या मंत्र्यांच्या प्रतापांमुळे महायुती सरकारच्या प्रतिमेला तडा जातो. यामुळेच गेल्या मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना नीट वागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे खडे बोल सुनावले. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या गैरकृत्यांवर उपमुख्यमंत्री शिंदे हे पांघरुण घालतात, असा भाजपचा आक्षेप आहे. कोकाटे यांचे कृषि खाते काढून एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचक इशारा दिल्याचे मानले जाते.