मुंबई : धार्मिक विधींमुळे मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावात साचलेले निर्माल्य काढण्यासाठी महानगरपालिकेने सलग तीन दिवस स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण १० मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. तसेच तलावातील माशांना पुरेसा प्राणवायू मिळावा, यासाठी वायूविजन व्यवस्थेद्वारे सहा पंपांद्वारे तलावातील पाणीही स्वच्छ करण्यात आले. या तलावाच्या स्वच्छतेसाठी सलग तीन दिवस महापालिकेचे कामगार – कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार, ऐतिहासिक बाणगंगा तलावाची स्वच्छता करण्यात आली. परिमंडळ १ च्या उप आयुक्त चंदा जाधव यांच्या देखरेखीखाली महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस तलावाची स्वच्छता केली.
वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे व्यवस्थापन एका खासगी संस्थेकडे आहे. पितृपक्षात मोठ्या प्रमाणात नागरिक बाणगंगा तलावात पिंडदानासाठी एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी धार्मिक विधीनंतर पिंडदानाचे साहित्य, निर्माल्य तलावात टाकू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने करण्यात आले होते. तसेच निर्माल्य आणि पिंडदानासाठी बाणगंगा तलावाजवळच कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. तसेच, निर्माल्य संकलनासाठी पिंप, कचरा संकलनासाठी कचरापेट्या ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांनी धार्मिक विधीच्या वेळी या कृत्रिम तलावाचा आणि पिंपाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून वारंवार केले जात होते. मात्र, नागरिकांनी धार्मिक विधी सुरूच ठेवले.
महानगरपालिकेकडून संपूर्ण पितृपक्षात तलावाची नियमितपणे स्वच्छता करण्यात येत होती. दररोज तलावातील निर्माल्य काढण्यात येत होते. दरम्यान, २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येला नागरिकांनी पिंडदानासाठी प्रचंड गर्दी केली. तलाव परिसरात कर्तव्यावर हजर असलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तलावात निर्माल्य आणि पाने-फुले टाकू नका, असे नागरिकांना आवाहन केले. तसेच कर्मचाऱ्यांनी तलावाच्या पायऱ्यांवरील कचराही ताबडतोब उचलून निर्माल्य कलशात एकत्र केला. तरीही काही नागरिकांनी बाणगंगा तलावात पिंडदान केले. परिणामी, तलावात मोठ्या प्रमाणात कचरा व निर्माल्य जमा झाले होते. त्यांनतर महानगरपालिकेच्या डी विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाने तलावाची स्वच्छता मोहीम हाती घेतली.
२१ सप्टेंबर रोजी ६ मेट्रिक टन, २२ सप्टेंबर रोजी २ मेट्रिक टन आणि २३ सप्टेंबर रोजी २ मेट्रिक टन असे एकूण दहा मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, संपूर्ण पितृपक्षात नागरिकांच्या सोयीसाठी तलाव परिसरात फिरत्या प्रसाधनगृहांचीही व्यवस्था करण्यात आली होती. तलावातील माशांना जास्तीत जास्त प्राणवायू मिळावा, यासाठी सलग तीन दिवस सहा पंपाद्वारे तलावातील पाण्याचा उपसा करण्यात आला.