मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे एकूण ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील एकूण १११ पैकी १०७ हेक्टर म्हणजे ९७ टक्के भरणीचे काम, तर, तटीय भिंतीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण किनारी रस्ता प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे.
सागरी किनारा रस्ता प्रकल्पतील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांद्रे सागरी सेतूपर्यंतच्या मार्गाचे काम मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. या मार्गांतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान प्रत्येकी २.०७० किलोमीटर अंतराचे जाण्या-येण्यासाठी दोन बोगदे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी प्रियदर्शिनी पार्क येथून नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गाच्या (मरिन ड्राईव्ह) दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पहिल्या बोगद्याचे खणन जानेवारीच्या २०२२ मध्ये पूर्ण झाले. दुसऱ्या बोगद्याचे काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाले असून आतापर्यंत दुसऱ्या बोगद्याचे ३९ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलांखाली बांधण्यात येणाऱ्या १७५ एकल स्तंभ खांबापैकी ७० म्हणजे ४० टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे.
बोगद्यांविषयी
या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७० किलोमीटर इतकी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास १२.१९ मीटर आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असणार आहे.