आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ५१ जणांची पहिली यादी जाहीर करून आघाडीत पहिली बाजी मारली आहे. काँग्रेसने यादी जाहीर करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त साधला असल्याचे दिसत आहे.

या यादीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावं आहेत. काँग्रेसचे जे परंपरागत व ज्या जागेबद्दल वाद नाही अशा मतदारसंघाचा या यादीत समावेश असल्याचे दिसत आहे.

यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, नितीन राऊत आदींचा समावेश आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून, काँग्रेसचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी येथून, सोलापूर शहर मध्यमधून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे तर लातूर शहरमधून अमित देशमुख  यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उद्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मतदारसंघात ते मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक झाली होती. त्यानंतरच काँग्रेसचे उमेदवार ठरले होते. शिवाय शनिवारी कॉंग्रेस राष्ट्रवादीची देखील बैठक झाली होती.