मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांच्या दैनंदिन प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या मार्गिकांवरून १८ जून रोजी २ लाख ९४ हजार ६८१ प्रवाशांनी प्रवास केला होता. या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील ही आतापर्यंतची विक्रम दैनंदिन प्रवासी संख्या होती. आता आठवड्याभरातच दैनंदिन प्रवासी संख्येने नवीन विक्रम केला आहे. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरून मंगळवार, २४ जून रोजी २ लाख ९७ हजार ६०० प्रवाशांनी प्रवास केला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये, तर दुसरा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. वाहतूक सेवेत दाखल झालेल्या या मार्गिकांना सुरुवातीला खूपच कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र मागील वर्षभरापासून प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळेच सुरुवातील प्रतिदिन ३० हजार असलेली प्रवासी संख्या आता २ लाख ६० हजारांवर पोहचली आहे. वर्षभरात दैनंदिन प्रवासी संख्येत महिन्याला ५ टक्क्यांनी वाढ होत असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. जूनमध्ये दैनंदिन प्रवासी संख्येने विक्रम केला. या मार्गिकांवरून १८ जून रोजी २ लाख ९४ हजार ६८१ प्रवाशांनी प्रवास केला होता. आता आठवड्याभरात त्यात वाढ झाली असून २४ जून रोजी दैनंदिन प्रवासी संख्येने २ लाख ९७ हजार ६०० चा पल्ला गाठला. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील ही आतापर्यंतची विक्रमी प्रवासी संख्या आहे.

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरून ८ ऑगस्ट रोजी २ लाख ६९ हजार २३० प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ होती. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी दैनंदिन प्रवासी संख्या थेट २ लाख ९२ हजार ५७५ वर पोहोचली. हा विक्रम थेट १८ जून २०२५ रोजी मोडला गेला. १८ जून रोजी २ लाख ९४ हजार ६८१ प्रवाशांनी प्रवास केला. तर आठवड्याभरातच २४ जून रोजी दैनंदिन प्रवासी संख्या २ लाख ९७ हजारांवर पोहचली. दैनंदिन प्रवासी संख्या वाढत असतानाच दुसरीकडे ई तिकिटांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण प्रवासी संख्येच्या ६४ टक्के प्रवासी ई तिकिटांचा वापर करीत आहेत. त्याचवेळी गुंदवली, अंधेरी पश्चिम, दहिसर पूर्व, मालाड पश्चिम आणि लोअर ओशिवरा या मेट्रो स्थानकांवरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करीत आहेत.