देशभरामधील करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशातील रेल्वे सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता मध्य रेल्वेनेही मुंबईतील लोकल ट्रेनची सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहील अशी औपचारिक घोषणा केली आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं आतापर्यंतचा सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. आज (रविवारी) मध्यरात्रीपासून देशात एकही रेल्वे धावणार नाही. ३१ मार्चपर्यंत रेल्वेनं होणारी देशातील प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. देशातील एक्स्प्रेस रेल्वेबरोबर मुंबईतील लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी मुंबईची लोकल सेवा रविवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चच्या मध्य रात्रीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ७४ करोनाग्रस्त रुग्ण अढळून आले आहेत. देशातील सर्वाधिक रुग्णांची संख्या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये खास करुन मुंबईमध्ये करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबईची लाइफलाइन असणारी लोकल ट्रेन बंद करण्यासंदर्भातील चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. जवळजवळ ७० लाख प्रवासी रोज उपनगरीय रेल्वे सेवेचा लाभ घेतात. त्यामुळेच गर्दी कमी करण्यासाठी मुंबईची लोकल ट्रेन बंद करणे गरजेची आहे मात्र अद्याप आम्ही असा निर्णय घेतला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून वारंवार सांगत होते. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लोकल ट्रेन बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याचा इशारा दिला असल्याचे वारंवार सांगितले होते. मात्र अखेर केंद्र सरकारनेच देशातील करोनाचा पसार थांबवण्यासाठी रेल्वेची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ लगेचच मध्य रेल्वेने उपनगरीय वाहतूक सेवाही बंद करणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच लोकल ट्रेनची सेवा नऊ दिवस बंद राहणार आहे.
आज जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. आज रेल्वेला गर्दी कमी असली तरी उद्यापासून पुन्हा गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळेच मुंबईची लोकल ट्रेन सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.