मुंबई : सरकारी भूखंड फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले पुरूषोत्तम चव्हाण यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास कनिष्ठ न्यायालयाने नुकताच नकार दिला. चव्हाण आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती आहेत.न्यायालयात सादर केलेल्या चव्हाण यांच्या वैद्यकीय कागदपत्रांचा विचार केल्यास त्यांना आजाराने ग्रासले आहे. तथापि, जामीन मंजूर करावा असा गंभीर आजार त्यांना झाला नसल्याचे दिसून येते, अशी टिप्पणीही न्यायालयाने चव्हाण यांना जामीन नाकाराताना नमूद केले. किंबहुना, अशा प्रकारची वैद्यकीय परिस्थिती किंवा आपत्कालीन स्थिती हाताळण्यास कारगृह प्रशासन आणि सरकारी रुग्णालये सक्षम असल्याचे निरीक्षणही न्यायदंडाधिकारी अभिजित सोलापुरे यांनी नोंदवले.
चव्हाण हे १२ वर्षांपासून बायपोलर डिसऑर्डरने आजारी आहेत. तसेच, त्यांच्यामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती निर्माण झाली आहे. कारागृह रुग्णालयात आपल्यावर उपचार सुरू असले तरी आपल्या नाक आणि कानातून रक्तस्त्राव होतो, शिवाय, डाव्या कानाजवळ सूज असून कदाचित आपण मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आहोत, असा दावा चव्हाण यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याची मागणी केली होती. या सर्व व्याधींचा आरोपीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्याला योग्य काळजी आणि उपचारांची आवश्यकता असून हे सर्व कारागृह रुग्णालयात शक्य नसल्याचा दावाही चव्हाण यांच्या वतीने युक्तिवाद करताना केला गेला. दुसरीकडे, चव्हाण यांनी कमी दरात सरकारी कोट्यातील भूखंड देण्याचे आश्वासन देऊन अनेकांना फसवले आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून कोट्यवधी रुपये वसूल केले, असा दावा करून सरकारी वकिलांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला.
आरोपीचा दुबईतही व्यवसाय असून जामिनावर सुटल्यास तो पळून जाण्याचा धोका असू शकतो. मानसिक आरोग्याचे पैलू आणि आरोपीला बायपोलर डिसऑर्डरचा सामना करावा लागत आहे हे तपासणीचे मुद्दे आहेत आणि अशा प्रमाणपत्रांच्या आधारे आजार निश्चित करता येत नाही, असे न्यायालयाने चव्हाण यांना जामीन नाकारताना स्पष्ट केले. तसेच, कारागृह अधीक्षकांनी कोठडीत चव्हाण यांच्यासाठी योग्य वैद्यकीय सेवा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले.
प्रकरण काय ?
सरकारी योजनेअंतर्गत दक्षिण मुंबई आणि लोअर परळसारख्या परिसरात सवलतीमध्ये सदनिका देण्याचे आश्वासन देऊन २४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चव्हाण यांना अटक केली आहे. तर प्राप्तिकर परतावा फसवणुकीशी संबंधित आणखी एका प्रकरणात चव्हाण आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत, सक्तवसुली संचालनालयही (ईडी) त्यांची चौकशी करत आहे. ईडीनंतर ईओडब्ल्यूने त्यांना अटक केली होती.
