मुंबई : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्या (मोक्का) अंतर्गत दाखल गुन्ह्यांत फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. आरोपी चोरीप्रकरणातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अब्दुल रहमान अफजल खान ऊर्फ शेरा (२९) व नफीस अहमद रोज खान (३३) अशी अटक आरोपींची नाव आहेत. त्यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये भारतीय दंड विधान कलम ३९२, ३४ अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल होता. त्याप्रकरणी त्यांना जामीन झाला होता. पण याप्रकरणी पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. मोक्का कायद्याचे कलम याप्रकरणात लावण्यात आले. याबाबतची माहिती आरोपींना मिळाल्यानंतर त्यांनी पलायन केले. तेव्हापासून आरोपी बेपत्ता होते. अखेर याप्रकरणी आरोपींना फरार घोषित करण्यात आले.
आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर गुन्हे शाखेच्या कक्ष-११ च्या पोलिसांनी याप्रकरणी समांतर तपासाला सुरूवात केली. त्यावेळी खबरे व तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता आरोपींची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. गोरेगाव प्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींचा ताबा गोरेगाव तेथील सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.