मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिला धमकावणे आणि तिचा अपमान केल्याप्रकरणी महानगरदंडाधिकारी यांनी सोमवारी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू केली. त्याचाच भाग म्हणून न्यायालयाने अख्तर यांना समन्स बजावून ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कंगना हिने अख्तर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यानंतर, अख्तर यांनी कंगनाविरोधात बदनामीप्रकरणी फौजदारी तक्रार नोंदवली होती. कंगनानेही अख्तर यांच्याविरोधात धमकावणे आणि अपमान केल्याची तक्रार नोंदवली होती. कंगना हिने केलेल्या या तक्रारीप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी अख्तर यांच्याविरोधात सोमवारी फौजदारी कारवाई सुरू केली, तसेच अख्तर यांना समन्स बजावून ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

कंगनाच्या तक्रारीनुसार, अभिनेता हृतिक रोशन याच्याशी झालेल्या वादाप्रकरणी अख्तर यांनी हृतिकची माफी मागण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. त्यांचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिल्यावर अख्तर यांनी आपल्याला धमकावले व आपला अपमान केल्याचा दावाही कंगनाने केला होता.