मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला आंदोलकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बृहन्मुंबई महापालिका चौकातील गर्दी वेगाने कमी होत आहे. चौकातील वाहने निघून जाण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे यांच्या आवाहनाला आंदोलकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
उच्च न्यायालयाने दिलेले आदेशाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी आंदोलकांना आझाद मैदान आणि पार्किंगसाठी दिलेली मैदाने सोडून अन्य ठिकाणी लावलेली वाहने काढून घेण्यास सांगितले होते, तसेच सीएसटीवरील गर्दी तातडीने कमी करण्याचे आदेश दिले होते. बृहन्मुंबई महापालिकेसमोरील चौक गत चार दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद होता.
हा चौकी तातडीने खाली करण्याचे आदेश जरांगे यांनी दिले होते. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बृहन्मुंबई महापालिका समोरील चौकातील वाहने निघून जाण्यास सुरुवात झाली आहे. चौकाने मोकळा श्वास घेतला आहे. पोलीस रस्त्याकडेला उभे राहून आंदोलन गाड्या घेऊन जात असताना पाहत आहेत. आंदोलकांची संख्या ही कमी होत आहे. गत चार दिवसापासून रात्री हलगी आणि झांजाच्या तालावर बेधुंदपणे नाचणारे मराठा आंदोलक आज बृहन्मुंबई महापालिका चौकात दिसत नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील चित्र यापेक्षा वेगळे नाही. गत चार दिवसांपासून आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी हलगी आणि झांजाच्या तालावर ठेका धरलेले आंदोलक सीएसटीवर दिसून येत होते. सोमवारी संध्याकाळी मात्र सीएसटी वरील गर्दी पूर्णपणे कमी झाल्याचे दिसून येते आहे. काही ठिकाणी आंदोलक शांतपणे झोपलेले दिसून आले, तरीही हे आंदोलक सुद्धा उद्यापासून सीएसटीवर थांबणार नाहीत, असे आंदोलकांनी स्वयंस्फूर्तीने लोकसत्ता अशी बोलताना सांगितले.
जरांगे यांनी केलेले केलेल्या आवाहनाला आंदोलकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आंदोलकांवर जरांगेचा असणारा प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. सोमवारी दोन दुपारी उच्च न्यायालयाने दिलेल्या दिशा आदेशानंतरही सीएसटी आणि बृहन्मुंबई महापालिकेचा चौकात गर्दी होती. मात्र, जरांगे यांनी आवाहन केल्यानंतर ही गर्दी तातडीने कमी होताना दिसत आहे.