मुंबई : सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी इंडोनेशिया , मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळणारे ५ सियामंग गिबन्स मुंबई विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाकडून जप्त केले. हे सियामंग गिबन्स प्लास्टिकच्या बॉक्समध्ये लपविण्यात आले होते. दरम्यान, भारतात प्राण्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या प्रवाशाला चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या ताब्यात देण्यात आले.
क्वालालंपूर येथून ५ फेब्रुवारी रोजी राज्ञी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका संशयीत प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले. विमानतळावरील नियमित तपासणीदरम्यान, सीमाशुल्क अधिकाऱ्यांना या संशयित प्रवाशाकडे ५ सियामंग गिबन्स आढळले. गिबन्स हे लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याच्या परिशिष्ट १ आणि वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूचीमध्ये संरक्षित प्रजाती आहेत. दरम्यान, हे सियामंग गिबन्स प्रवाशाने ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या बॉक्सत आणि छोट्या पिंजऱ्यात लपवले होते. दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या ही प्रजाती प्रामुख्याने आग्नेय आशियातील काही भागात आढळतात आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्यांना अत्यंत संरक्षण दिले आहे. दरम्यान, गिबन्सला त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
गिबनपैकी सर्वात मोठा सियामंग हा इतर गिबनच्या दुप्पट आकाराचा असतो. सिम्फॅलॅंगस वंशातील ही एकमेव प्रजाती आहे. सियामंगच्या दोन उपप्रजाती आहेत. यामध्ये सुमात्रन सियामंग आणि मलेशियन सियामंग या प्रजातींचा समावेश आहे. तस्करीमुळे सियामंग ही प्रजाती धोक्यात आली आहे. याचबरोबर इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशांमध्ये त्यांचा अधिवासही नष्ट होत चालला आहे. सियामंगचे केस लांब, दाट असतात. सियामंगची सरासरी लांबी ९० सेमी असते. सियामंग प्रामुख्याने आहार म्हणून जंगलातील विविध वनस्पती खातात. त्यांच्या आहारात ६० टक्के फळांचा समावेश असतो. त्यांचा मुख्य अन्नस्त्रोत अंजीर आहे. सियामंग प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळतात.
© The Indian Express (P) Ltd