धमकीच्या बातम्यांमुळे सहभाग स्पष्ट

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत ३४ वाहनांमध्ये ४०० किलो आरडीएक्स लपवले असून एक कोटींहून अधिक नागरिकांचा बळी जाऊ शकतो, असा धमकीचा संदेश मुंबईतील वाहतूक पोलिसांना पाठवणारा संशयीत अश्विन सुप्रा हा सराईत सायबर भामटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने अशा प्रकारे दूरध्वनी करून बिहारमधील व्यावसायिकालाही धमकावले व तोतयागिरी करून सायबर फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. धमकीच्या बातम्यांमुळे बिहार पोलिसांना अश्विन सुप्राच्या अटकेची माहिती मिळाली. त्या आधारावर बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन आरोपीला अटक केली. सात सीमकार्ड सापडलेल्या अश्विनविरोधात पटनामध्ये दोन गुन्हे दाखल आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप मदत क्रमांकावर लश्कर-ए-जिहादी या संघटनेच्या नावाने धमकीचा संदेश आला होता. त्यात मानवी बॉम्ब, आरडीएक्सचा उल्लेख आणि दहशतवाद्यांचा सहभाग या दाव्यांमुळे काही काळ पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली होती. विशेषतः अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याने पोलिसांनी तातडीने ठोस पावले उचलली आणि गुप्तचर विभागाला माहिती दिली. या घटनेनंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी नोएडा पोलिसांशी संपर्क साधला.

नोएडा पोलिसांनी कारवाई करून अश्विनी सुप्रा नावाच्या संशयिताला अटक केली. तो मूळचा बिहारचा असून, मागील काही वर्षांपासून नोएडामध्ये राहत होता. त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला असून त्यातूनच धमकीचा संदेश पाठवण्यात आल्याचे उघड झाले होते. आरोपीकडे सात सीमकार्ड असून त्याद्वारे सायबर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोपी अश्विनने यापूर्वी बिहारमधील पुस्तकांच्या दुकानाच्या मालकाला वारंवार निनावी दूरध्वनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तो स्वतःला वरिष्ठ अधिकारी, सीमाशुल्क अधिकारी भासवून तक्रारदाराला सीमाशुल्क विभागाने पकडलेले सोने स्वस्तात देण्याचे बहाण्याने आठ लाखांची सायबर फसवणूक केली आहे. ५ मेला हा प्रकार घडला होता. आरोपींविरोधात बिहारमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत.

धमक्यांची मालिका

यापूर्वीही मुंबईत दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या धमक्या आल्या होत्या. ऑगस्ट महिन्यात पोलीस महासंचालकांच्या कुलाबा येथील कार्यालयात स्थानिक गाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी आला होता. काही दिवसांपूर्वी शाळा, शासकीय कार्यालये व दूतावास उडवून देण्याच्या धमक्या मेल आणि फोनवरून देण्यात आल्या होत्या. अगदी वरळीतील फोर सिझन्स हॉटेललाही ई-मेलद्वारे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आली होती. तपासात हे सर्व खोडसाळ प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते.