मुंबई : सायबर गुन्हे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असली तरी दुसरीकडे सायबऱ भामटे एक पाऊल पुढे असतात. फसवणुकीसाठी ते नवनवीन क्लृप्त्या शोधत असतात. ओटीपी देताना सावधगिरी बाळगली जात असल्याने सायबर भामटे आता व्हिडियो कॉल करून ओटीपी मिळवत असल्याचे समोर आले आहे. बोरीवलीतील एका सनदी लेखापाल (सीए) तरुणीला सायबर भामट्यांनी अशाप्रकारे व्हिडिओ कॉल करून सव्वा दोन लाख रुपये लुबाडले आहेत.
बोरिवलीत राहणारी २४ वर्षीय नेहा दाभाडे (नाव बदलले आहे) ही तरूणी सनदी लेखापाल (सीए) आहे. नुकतीच तिला वांद्रे येथील एका कंपनीत नोकरी मिळाली होती. कंपनीतील कर्मचार्यांची खाती अॅक्सीस बॅंकेत उघडली जातात. त्यानुसार नेहाचे बचत खाते अॅक्सीस बॅंकेत उघडण्यात आले होते. खाते उघडल्यावर नवीन सभासदांना बॅंकेकडून आकर्षक बोनस दिला जातो. तसा संदेश नेहा यांना मिळाला होता. मात्र प्रत्यक्षात त्या बोनसची रक्कम त्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी बॅंकेच्या अधिकृत ईमेलवर संपर्क साधून पत्रव्यवहार केला होता.
दरम्यान, त्यांना एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने अॅक्सीस बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने नेहा दाभाडे यांचे तपशील सांगून तिने बोनस संदर्भात बॅंकेत केलेल्या ईमेलची माहिती दिली. त्यामुळे संबंधित व्यक्ती बॅंकेतील असल्याची खात्री नेहा यांना वाटली. तांत्रिक कारणामुळे बोनस देण्यात अडचणी येत आहे असे सांगून नेहा यांना ॲप उघडण्यास सांगितले. याच काळात अचानक त्या व्यक्तीने कशी माहिती भरायची हे सांगण्यासाठी व्हिडिओ कॉल केला. बॅंकेतील व्यक्तीचाच कॉल असल्याने नेहा यांनी व्हिडियो कॉल उचलला. त्याचवेळी नेहा यांना आलेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड) त्यांच्या स्क्रीनवर दिसला. त्या ओटीपीच्या आधारे समोरील ठकसेनाने त्यांच्या खात्यातील २ लाख २१ हजार रुपये लुटले.
माझ्या घरात लग्न कार्य सुरू असल्याने मी गडबडीत होते. त्याच दरम्यान मला बॅंकेतून बोलतोय असे भासवून एका व्यक्तीने मला बोलण्यात गुंतवले होते असे नेहा यांनी सांगितले. मी स्वत:हून ओटीपी दिला नाही मात्र ओटीपी स्क्रीनवर काही वेळासाठी दिसतो तो त्यांनी टिपून माझ्या बॅंकेतील रक्कम काढली असे नेहा यांनी सांगितले. मी अॅक्सीस बॅंकेशी व्यवहार केला होता. तो तपशील सायबर ठकसेनांना कसा मिळाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी नेहा यांनी तात्काळ महाराष्ट्र सायबर कक्षाच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क करून तक्रार दाखल केली होती. हे प्रकऱण बोरीवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. मात्र बॅंकेकडून माहिती आल्यावर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितल्याचे तक्रारदार नेहा यांनी सांगितले.
अधिक सतर्क राहण्याचे पोलिसांचे आव्हान
बॅंकेतून माहिती त्रयस्थांकडे जाणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ग्राहकांच्या गोपनीय माहितीचा गैरवापर होत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले. सायबर भामटे नवनवीन शक्कल लढवत असल्याने नागरिकांना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सायबर भामटे सक्रीय झाले आहे. विविध योजनांचे आमिषे दाखवून, प्रलोभन देऊन ते लोकांना गंडवत असतात. सध्या सिनेमा प्रमोशन करा, यूट्यूब व्हिडियो लाईक करा, घरबसल्या कमवा असे सांगून फसविण्याच्या गुन्ह्याचा ट्रेंड सुरू आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तींबरोबर कुठलेही ऑनलाईन व्यवहार करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.