मुंबई : अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. ‘शक्ती’ हे २०२५ मधील पहिलेच चक्रीवादळ आहे. या वादळाची निर्मिती शुक्रवारी दुपारनंतर झाली. किनाऱ्यापासून पश्चिमेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र मध्य भारताकडून प्रवास करीत अरबी समुद्राकडे आल्यानंतर ईशान्य अरबी समुद्रात त्याची तीव्रता वाढू लागली आहे. ही प्रणाली शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी गुजरातमधील द्वारकेपासून २५० किलोमीटर, तर नालियापासून २८० किलोमीटर नैऋत्येकडे , पोरबंदरपासून २८० किलोमीटर पश्चिमेकडे आणि पाकिस्तानच्या कराचीपासून ३८० किलोमीटर दक्षिणेकडे होती.
ही प्रणाली सोमवारपर्यंत सक्रिय राहणार
‘शक्ती’ चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर समुद्राकडे जात असून, शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी मध्य अरबी समुद्रात आणखी तीव्र होणार आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात ताशी १०० ते १२५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, ही प्रणाली सोमवारपर्यंत कायम राहणार आहे.
मासेमारीला न जाण्याचा इशारा
गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत ५ ऑक्टोबरपर्यंत ४५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र
बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ओडिशामध्ये जमिनीवर आले असून, ही प्रणाली गोपाळपूरपासून ५० किलोमीटर नैऋत्येकडे होती. उत्तरेकडे सरकत असलेली ही प्रणाली आज छत्तीसगडकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा परिणाम काय?
गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळाचा फारसा प्रभाव महाराष्ट्रावर नसेल. कोकणात शनिवार, ४ आणि रविवार, ५ ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नाही. यासंबंधी इतर काही सुधारीत अंदाज हवामान विभागाने वर्तवलेले नाहीत. चक्रीवादळला ‘शक्ती’ नाव कसे पडले ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, २०२५ मधील हे पहिले चक्रीवादळ आहे. ‘शक्ती’ हे नाव श्रीलंकेने सुचविले आहे. तमिळ भाषेतील ‘शख्ती’ (शक्ती) या शब्दाचा अर्थ ‘सामर्थ्य’ असा आहे. यावरून हे नाव देण्यात आले आहे.
यापूर्वी फेंगल चक्रीवादळ
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात ‘फेंगल’ चक्रीवादळ तयार झाले होते. ३० नोव्हेंबर रोजी ‘फेंगल’ तमिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकले होते. त्यानंतर ११ महिन्यानी आता ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. ‘फेंगल’चा फटका उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीला बसला होता. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.