मुंबई : इशारे आणि कारवाईनंतरही दादर येथील कबुतरखान्यात कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्याविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली. दादर येथील कबुतरखाना नुकताच बाबूंच्या साहाय्याने पूर्णपणे बंद करण्यात आला असून ताडपत्रीने झाकण्यात आला आहे. मात्र, तरीही कबुतरांचे थवे तेथे येतच आहेत.

हजारो कबुतरे अन्नाच्या शोधात कबुतरखान्याभोवती जमा होत आहेत. दरम्यान, जैन समुदायासह, प्राणीप्रेमींनी कुलाबा जैन मंदिर येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत शांतिदूत यात्रा काढून कबुतरखान्यांवरील कारवाईचा निषेध केला.

कबुतरांना दाणे टाकणे सुरूच

कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे श्वसनाचे अनेक आजार होत असल्याने अनेक वर्षांपासून मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी, असे आदेश महानगरपालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर महापालिकेने दादरमधील कबुतरखान्यावर कारवाई केली होती. तरीही अनेक ठिकाणी प्रशासनाचा डोळा चुकवून कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार सुरू होते. 

दादर कबुतरखान्याचा बंदोबस्त

दोन दिवसांपूर्वी दादर कबुतरखाना बंद करण्यासाठी पोहोचलेल्या महापालिका कामगार – कर्मचाऱ्यांना प्राणीप्रेमींनी प्रचंड विरोध केला. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अखेर कारवाई तात्पुरती स्थगिती करण्यात आली. त्यांनतर शनिवारी पुन्हा कबुतरखाना बंद करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले आणि बाबूंच्या साहाय्याने कबुतरखाना पूर्णपणे बंद केला. तसेच, बाबूंच्या फटीतून कबुतर आत शिरू नयेत, यासाठी ते ताडपत्रीने झाकण्यात आले. 

कबुतरप्रेमींची आंदोलने सुरूच

मात्र, भुकेने सैरावैरा झालेली हजारो कबुतरे रविवारी पुन्हा कबुतरखान्याकडे परतली. इमारती, दुकाने व घराच्या छतावर ती दाण्यांच्या आशेने जमा झाली होती. प्रशासनाने कबुतरखाने बंद केले. मात्र, भुकेने तडफडणाऱ्या कबुतरांचे आता काय करायचे, असा प्रश्न प्राणीप्रेमींनी उपस्थित केला आहे. दरम्यान, कबुतरखान्यांवरील कारवाईविरोधात प्राणीप्रेमींनी रविवारी कुलाबा जैन मंदिर येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत शांतिदूत यात्रा काढली.

जैन मंदिरात सामूहिक नवकार जप केल्यानंतर हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर गणपती मंदिरात आरती करून गेट वे ऑफ इंडिया येथे पाणी समर्पण करण्यात आले. मुंबईतील मोक्याच्या जागा, चौक हडपण्यासाठी कबुतरखान्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक पूरण दोषी यांनी केला. कबुतरांच्या खाद्यावरील निर्बंधांमुळे अनेक कबुतरांचा भुकेने तडफडून मृत्यू होत आहे. तसेच, येत्या चार दिवसांत कबुतरांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही, तर १० ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.