मुंबई : वरळी शिवडी उन्नत रस्त्यासाठी प्रभादेवी येथील जुना पूल तोडल्यामुळे दादरच्या टिळक पुलावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. इतकेच नाही तर आधीच गजबजलेल्या दादर परिसरात आता अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पादचारी, वाहनचालक यांच्याबरोबरच दादरमधील रहिवासी, व्यापारी यांना या वाहतूक कोंडींचा दररोज सामना करावा लागतो आहे. सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे दादरमध्ये असह्य अशी वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांची वर्दळ वाढणार आहे. दादर व्यापारी संघाने या प्रश्नी पालिका आणि पोलिस प्रशासनाला पत्र लिहून यावर युद्धपातळीवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

वरळी शिवडी उन्नत मार्गासाठी प्रभादेवीचा (एलफिन्स्टनचा) पूल पाडण्यास सुरूवात झाली आहे. गणेशोत्सवानंतर हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला आहे. मात्र वाहतुकीचे कोणतेही नियोजन न करता हा पूल पाडून टाकल्यामुळे या पुलाला समांतर असलेले करीरोड पूल आणि टिळक पूल या ठिकाणची वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. त्यातही टिळक पूल आणि परिसरात अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. आधीच वाहतूक कोंडी, त्यात कुठेही कसेही बसलेले फेरीवाले यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. त्यामुळे प्रभादेवी पूल बंद करण्यापूर्वी वाहतुकीचे नियोजन करायला हवे होते. किमान आता तरी मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई करून हे रस्ते मोकळे करावे, अशी मागणी दादर व्यापारी संघाचे सुनील शाह यांनी केली आहे.

सणासुदीसाठी लागणारे साहित्य, कपड्यांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या दादरमध्ये गर्दी ही रोजचीच असली तरी प्रभादेवीचा पूल पाडल्यापासून या भागात गर्दीचा, वाहनांच्या वर्दळीचा विक्रम रोजच मोडीत निघू लागला आहे. गर्दीत कसे तरी वाट काढणारे पादचारी, दुतर्फा कुठेही कशाही उभ्या असलेल्या गाड्या, त्यातच मध्येच रस्त्यावरच व्यवसाय थाटणारे फेरीवाले आणि हॉर्न वाजवणाऱ्या गाड्या, यामुळे दादरमधील गर्दी दिवसेंदिस असह्य होऊ लागली आहे. त्यातच आता सणासुदीचे दिवस आल्यामुळे ही गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

दादर, शिवाजी पार्क, माहीम परिसराला फटका

दादर व्यापारी संघाचे सुनील शाह यांनी सांगितले की, प्रभादेवी पूल पाडल्यामुळे केवळ दादरमध्येच नाही तर शिवाजी पार्क, शितलादेवी मंदिर, माहीम या परिसरातही वाहतूक कोंडी वाढली आहे. भवानी शंकर मार्ग आणि कबुतरखाना, एस. के. बोले रोड येथे अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते आहे. तर दुसरीकडे दादरमध्ये फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही वाट काढणे मुश्कील झाले आहे. रानडे रोड, केळकर रोड, कबुतरखाना येथील रस्ते, पदपथ फेरीवाल्यांनी आणि खरेदीदारांनी व्यापलेले आहेत. मात्र मुंबई महापालिका या फेरिवाल्यांवर काहीही कारवाई करीत नाही, अशी खंत शाह यांनी व्यक्त केली. प्रभादेवी पूल बंद करण्यापूर्वी खरेतर आपत्कालीन व्यवस्थापन करून दादरमधील रस्ते मोकळे करायला हवे होते. फेरीवाल्यांंवर कारवाई करायला हवी, अशी मागणी करीत दादर व्यापारी संघाने पोलिस व पालिका प्रशासनाला पत्रही लिहिले आहे.

अनधिकृतपणे उभ्या वाहनांमुळे गर्दीत भर

प्रभादेवी पूल पाडल्यामुळे दादरच्या प्लाझा चित्रपटगृह परिसरात प्रचंड गर्दी वाढली आहे. प्लाझा चित्रपटगृहाच्या बाजूच्या जे. के. सावंत मार्गावर वाहनांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या असतात, असे शिवाजी पार्कचे रहिवासी अजित पडवळ यांनी सांगितले. या ठिकाणी वाहतूक पोलिस दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत तैनात करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या परिसरात कोहिनूर स्क्वेअर ,रूबी टॅावर अशा गगनचुंबी व्यावसायिक इमारती आहेत. येथे कर्मचाऱ्यांच्या किंवा ग्राहकांच्या गाड्या या भागात उभ्या असतात. त्यामुळे प्रभादेवी पूल बंद आहे तोपर्यंत दादरच्या रहिवाशांना किंवा अनधिकृतपणे रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्यांना मुंबई महापालिकेच्या वाहनतळात सवलतीच्या दरात गाड्या उभ्या करण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांचे हाल

टिळक पुलावर वाहतूक कोंडी वाढल्यामुळे दादरहून वडाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही हाल होऊ लागले आहेत. टिळक पुलावरील वाहतूक कोंडीमुळे बसगाड्या वेळेवर येत नाहीत, शेअर टॅक्सीही मिळत नाहीत. तर टॅक्सी करणेही परवडू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे मी दादरहून वडाळ्याला जाण्यापेक्षा आता हार्बर मार्गाने वडाळा स्थानक गाठतो आणि तिथून महाविद्यालयात जातो, असे बोरिबलीहून वडाळ्यातील महाविद्यालयात जाणाऱ्या क्षितीज पालेकर यांने सांगितले.