मुंबई : मुंबईच्या वेशीवर असणार्या दहिसर पथकर नाक्यामुळे त्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून या वाहतूक कोंडींमुळे प्रवाशी-वाहनचालक त्रस्त आहेत. त्यामुळे दहिसर पथकर नाका इतरत्र स्थलांतरीत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला. तर हे स्थलांतरण दिवाळीपर्यंत करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे होते. मात्र पथकर नाक्याच्या स्थलांतरासाठी एमएसआरडीसीला अद्याप जागाच सापडत नसल्याने स्थलांतरण कागदावरच राहिले आहे. एमएसारडीसीकडून जागेचा शोध सुरु असून एमएसआरडीसीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही (एनएचएआय) जागेसाठी साकडे घातले आहे.
दहिसर पथकर नाका हा शहराच्या आत असून येथील रस्ता, जागा अरुंद आहे. त्यामुळे वाहनांकडून पथकर वसूली करण्यासाठी वेळ लागतो. परिणामी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. याचा फटका मिरा-भाईंदर,वसई-विरार, ठाण्याच्या दिशेने जाणार्या वाहनांना बसतो. दहिसर पथकर नाका परिसरातील वातूक कोंडीने नागरिक, वाहनचालक-प्रवासी त्रस्त आहेत. त्यामुळे हा पथकर नाका इतरत्र हलविण्याची मागणी स्थानिकांची मागील कित्येक वर्षापासून आहे. ही मागणी लक्षात घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एक बैठक घेत वर्सोवा पुलाजवळी नर्सरीसमोर पथकर नाका स्थलांतरीत करण्याचे निर्देश एमएसआरडीसी दिले होते. तर दिवाळीदरम्यान पथकर नाक्याचे स्थलांतरण पूर्ण होऊन नागरिकांचा वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल असे म्हटले होते. मात्र दिवाळी होऊन गेली तरी पथकर नाक्याच्या स्थलांतरणाच्यादृष्टीने कोणतीही पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. वर्सोवा पुलाजवळी नर्सरीसमोर पथकर नाका स्थलांतरीत करण्यास स्थानिकांनी आणि राजकीय नेत्यांनी विरोध केल्याने पथकर नाक्याचे स्थलांतरण नेमके कुठे करायचे हा प्रश्न आता एमएसआरडीसीसमोर आहे. कारण पथकर नाका सध्या जिथे आहे त्या पुढे एनएचएआयची हद्द सुरु होते. त्यामुळे एनएचएआयच्या हद्दीत पथकर नाका हलविण्यासाठी त्यांच्याकडून जागा घेणे, त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेणे अशी प्रक्रिया एमएसआरडीसीला करावी लागणार असून त्यात बराच वेळ जाण्याची शक्यता आहे.
पथकर नाक्यासाठी जागा द्यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी एमएसआरडीसीने एनएचएआयकडे एका पत्राद्वारे केली आहे. मात्र त्यात कुठे आणि कोणतीही जागा द्यावी याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे आम्ही कशी जागा निश्चित करणार असे म्हणत एनएचएआयने एमएसआरडीसीलाच जागा निश्चित करण्याचे सुचित केले आहे. एमएसआरडीसी आणि एनएचएआय यांच्याकडून जागेबाबत निश्चित होत नसल्याने पथकर नाक्याचे स्थलांतर रखडले आहे. आता जागा केव्हा उपलब्ध होणार आणि पथकर नाक्याचे स्थलांतरण होऊन नागरिकांना दिलासा केव्हा मिळणार हाच प्रश्न आहे. दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच पथकर नाक्याची पाहणी केली असून त्यांनी ८ नोव्हेंबरपर्यंत पथकर नाका स्थलांतरीत होईल असे जाहिर केले आहे. मात्र जागाच निश्चित नसल्याने ८ नोव्हेंबरपर्यंत पथकर नाक्याचे स्थलांतरण कसे होणार हाही प्रश्न आता निर्माण झाला आहे.
