मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून या दरडी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात येणार आहे. तसेच मार्गावरील दरडी कोसळण्याच्या भागाचा भूगर्भीय अभ्यास करण्याचाही निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतलयाची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अलीकडच्या काळात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून रविवारी आडोशी भोगद्याजवळ दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जण ठार तर ६ जण जखमी झाले होते. या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती.  आंबोली आणि माळशेज घाटात कोसळणाऱ्या दरडी रोखण्यासाठी जीओ ब्रु आणि आयसोफर या कंपन्यांची मदत घेण्यात आली होती. या कंपन्यांकडे असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही जाळी बसविण्यात येणार असून त्याबाबतच्या निविदा पुढील आठवडय़ात काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत रात्री मुख्यमंत्र्यांकडेही बैठक झाली असून त्यांनीही या उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
बोगद्याचा विस्तार
आडोशी बोगद्याच्या बाजूला वारंवार दरडी कोसळत असल्यामुळे या बोगद्याचा विस्तार करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून स्टीलच्या साह्य़ाने हा बोगद्याचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे कोसळणाऱ्या दरडी या बोगदय़ावरच थांबतील आणि दुर्घटना टळतील, असा दावा केला जात आहे. त्याचप्रमाणे दरडी कोसळणाऱ्या भागाचा भूगर्भीय अभ्यास करून तेथे जाळय़ा लावण्याचे काम करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous stones to be remove from mumbai pune express highway