जयेश शिरसाट
धारावीतला चर्मोद्योग, दक्षिण मुंबईतील चामडय़ाच्या वस्तूंच्या बाजारपेठा, मॉलमधील आलिशान बुटीक, देशी-विदेशी कंपन्यांची चामडय़ाची पादत्राणे विक्रेते आदी व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. घसघशीत सूट जाहीर करूनही चामडय़ाच्या वस्तूंच्या खरेदीपासून ग्राहक अद्याप दूर आहे.
चामडे कमावणाऱ्या टॅनरी, कमावलेल्या चामडय़ाचे घाऊक विक्रेते, त्यापासून पट्टा, पाकीट, पर्स, क्लच, प्रवास बॅग, ऑफिस बॅग, कार्ड होल्डर, ज्वेलरी बॉक्स, वॉच-कपलिंग के स, पादत्राणे, की चेन आदी वस्तू तयार करणारे कारखाने आणि या वस्तू विकणारी अनेक दुकाने अशी साखळी धारावीत आहे.
धारावीतील ‘रोज लेदर बॅग्ज’ दुकानाचे मालक इस्लामुद्दीन खान यांनी करोनामुळे दिवाळीही हातची गेल्याचे सांगितले. दिवाळीच्या दोन महिनेआधी बँका, कॉपरेरेट कंपन्या, कार्यालये आपल्या कर्मचारी, कामगार, ग्राहकांना भेटवस्तू देण्यासाठी धारावीतल्या उत्पादकांकडे आगाऊ मागणी नोंदवतात. गेल्या वर्षी एक मागणी ३० ते ३५ लाखांची होती. त्यातून १५ टक्के नफा झाला. यंदा लाखो रुपयांचा माल कवडीमोल भावात विकणे आणि नव्या मागणीची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसल्याचे खान यांनी सांगितले.
‘ब्रॅण्डेड’ पादत्राणे विकणाऱ्या व्यावसायिकांचाही अनुभव असाच आहे. कु लाबा येथील ‘मेट्रो शू’चे व्यवस्थापक आर. पी. मलकानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दीड ते चार हजार रुपयांची पादत्राणे, बूट दीडशे ते तीनशे रुपये इतक्या सवलतीच्या दरात विकत आहोत. सवलत पाहून ग्राहकांची गर्दी निश्चित वाढली, पण त्यामुळे सवलतीबाहेरील वस्तूंच्या विक्रीला चालना मिळालेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीआधीचा व्यवसाय ७० ते ८० टक्क्यांनी घटला आहे, असेही मलकांनी यांनी सांगितले.
पावसाळ्याचे दोन महिने सोडले तर चामडय़ाच्या वस्तूंची बाजारपेठ वर्षभर सुरू असते. एप्रिल-मे हा प्रमुख हंगाम. शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने पर्यटन आणि लग्नसराईमुळे प्रवासाच्या बॅगांपासून जॅकेट, बूट, पट्टा, पाकिटांपर्यंत प्रत्येक वस्तूची मागणी वाढते. दिवाळीत नव्या कपडय़ांसह बूट आणि अन्य चामडी वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. दिवाळी, नाताळ आणि नववर्षांसाठी कॉपरेरेट कं पन्यांकडून काही वस्तूंची मागणी येते. परंतु यंदा मंदीच आहे, असे ‘आर. के . इंटरनॅशनल कं पनी’चे रमेश कदम यांनी सांगितले.
टाळेबंदी शिथिल झाली. दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या तरी धारावीतल्या दुकान चालकांचा दिनक्र म मार्च-एप्रिल महिन्यासारखाच आहे. सकाळी शोरूम सुरू करायचे, ग्राहकांची वाट पाहायची आणि संध्याकाळी रिकाम्या हाती दुकान बंद करून घरी परतायचे, अशी हताश भावना व्यावसायिक चंद्रकांत खाडे यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सना फटका
* बॅरल्युटी, लुई वीटॉन, बाली, सेल्वेटा फॅ रागामा, गुची, टॉड्स, हर्मस् या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सनाही टाळेबंदीचा फटका बसला आहे. या ब्रॅण्ड्सचे एक जोड कातडी बूट किं वा पर्सही लाखाच्या घरात आहे. इटली, पॅरिस, युरोपातील या ब्रॅण्डची उत्पादने विकणारे एखाद दुसरे दुकान मुंबई, महानगर प्रदेशात आहे. तरीही या महागडय़ा ब्रॅण्डच्या वस्तू खरेदी करण्यामध्ये भारतीय पुढे आहेत.
* लक्झरी प्रॉडक्ट्स विकणाऱ्या आतीष कांबळी यांनी दिलेल्या माहितीनुसार मनगटी घडय़ाळ, गॉगल, बूट, पट्टा आणि पैशांचे पाकीटही स्टेटस दर्शविण्यासाठी खरेदी के ले जातात. ग्राहकाने वस्तू कोणत्याही देशातून विकत घेतली तरी त्याची नोंद संबंधित कं पन्या ठेवतात. एरवी महिन्याकाठी सरासरी २० लाखांच्या ब्रॅण्डेड वस्तूंची मागणी गेल्या आठ महिन्यांमध्ये अवघ्या ५० हजारांवर आल्याचे कांबळी यांनी सांगितले. नवश्रीमंतांनीही खरेदीत हात आखडता घेतल्याचे ते म्हणाले.