अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्टिफिशल इंटेलिजन्सचा (कृत्रिम प्रज्ञा) गैरवापरही होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. याचे उदाहरण म्हणजे डीप फेक तंत्रज्ञान समजण्यात येते़ सध्या या तंत्रज्ञानाने अनेकांची डोकेदुखी वाढवली आहे़

रश्मिका मंधाना, काजोलनंतर आता क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या चित्रफितीतही कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने फेरफार करण्यात आले. छायाचित्र आणि चित्रफितींची ‘मॉर्फिंग’ फार पूर्वीपासून सुरू आहे, पण कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने त्यातील फरक करणे जवळपास अशक्य झाले आहे. ‘मॉर्फिंग’प्रकरणाला अनेकजण बळी ठरत आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने एका ३७ वर्षीय अभिनेत्रीचे अश्लील छायाचित्र तयार करून नुकतेच समाज माध्यमांद्वारे तिचे मित्र व कुटुंबीयांना पाठवणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपीने या अभिनेत्रीला ठार मारण्याची धमकीही दिली होती. डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवड्यापासून हा प्रकार सुरू आहे. कुलदीप द्विवेदी नावाच्या फेसबुक खात्यावरून तिचे अश्लील छायाचित्र प्रसारित करण्यात येत आहे. त्याच इन्स्टाग्राम खात्यावरूनही या अभिनेत्रीचे छायाचित्र प्रसारित करण्यात आले. याशिवाय व्हॉट्स ॲपवरून तिच्या आई-वडिलांनाही छायाचित्र पाठवण्यात आले. तिला मित्रांकडून याबाबत माहिती मिळू लागली. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. मात्र, एका मित्राला इन्स्टाग्रामवर पाठवण्यात आलेल्या संदेशात तिला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आई-वडिलांनाही व्हॉट्स ॲपद्वारे अभिनेत्रीची अश्लील छायाचित्रे पाठवण्यात आल्यामुळे हा प्रकार गंभीर असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने तात्काळ याप्रकरणी वर्सोवा पोलिसांकडे तक्रार केली.

हेही वाचा >>> पूर्व मुक्तमार्ग, ग्रॅन्ट रोड जोडणीच्या खर्चात वाढ, प्रकल्पाचा अंदाजित खर्च ६६२ कोटींवरून ११०० कोटींवर

व्हॉट्स ॲपद्वारे संशयित आरोपीचा मोबाइल क्रमांक अभिनेत्रीला प्राप्त झाल्यानंतर तिने त्याची माहितीही पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भादंवि कलम ५०६ व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६७ (तंत्रज्ञानाच्या मदतीने अश्लील छायाचित्र अथवा चित्रफित प्रसारित करणे) व ६७ अ (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील छायाचित्र पाठवल्याबद्दल शिक्षा) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीची माहिती मिळाली. पण, आरोपी सतत त्याचे ठिकाण बदलत होता. त्याचे समाजमाध्यमांवरील खाते आणि मोबाइल क्रमांकावरून पोलीस त्याचा माग काढत होते. अखेर त्याला पकडण्यात यश आले. आरोपी संगणक अभियंता आहे. तो पुण्यात एमबीएचे शिक्षण घेत होता आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या संपर्कात आला.

हेही वाचा >>> मुंबई : आरटीई मान्यतेशिवाय २१८ शाळा, मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे प्राथमिक शिक्षक संचालकांचे आदेश

तंत्रज्ञानाच्या माध्यामातून एखादी चित्रफित किंवा छायाचित्रावरील व्यक्तीचा चेहरा, आवाज बदलता येतो. व्यक्तीचा हुबेहूब चेहरा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वापरता येतो. ज्या व्यक्तीचा चेहरा वापरायचा आहे त्याचा चेहरा हे तंत्रज्ञान ‘स्कॅन’ करून घेते आणि चित्रफितीमधील व्यक्तीच्या चेहऱ्यावर ‘मास्क’ म्हणून तयार करते. पण, हे तंत्रज्ञान घातक स्वरूप घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबाबत चिंता व्यक्त केली होती. गंभीर बाब म्हणजे या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणाच्या तोंडी स्फोटक व प्रक्षोभक विधाने टाकून मोठा वादही निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळे वेळीच त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ‘डीपफेक’चा वापर ‘अश्लिल चित्रफीत’ तयार करण्यासाठी सुरू झाला आहे. पण, आता या राक्षसाने हातपाय पसरवून आक्राळविक्राळ रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून सामान्य नागरिकांमध्ये भ्रम होऊ शकतो. ‘डीपफेक’ चित्रफितीमध्ये असलेले व्यक्ती पापण्यांची उघडझाप करत नाहीत. पण काही कृत्रिम बुद्धिमत्ता ‘टूल’मध्ये त्याचेही अद्यायावतीकरण करण्यात आले आहे. अनेक डीपफेक चित्रफितींची गुणवत्ता एवढी चांगली नाही. त्यामुळे ते ओळखणे सोपे आहे. त्याशिवाय चित्रफितीच्या कडेला पाहूनही अशी चित्रफित ओळखता येऊ शकतो. त्यात कडेला लुकलुकणारा एक प्रकाश दिसतो. पण, अद्यायावतीकरणामुळे त्यातही सुधारणा झाली आहे. त्यामुळे डीपफेक चित्रफित ओळखणे तसे सोपे राहिले नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deep fake technology misuse of artificial intelligence zws