लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : धारावी रिडेव्हलमेन्ट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत लवकरच रेल्वेच्या जागेवर पाच प्रकारच्या नमुना सदनिका (सॅम्पल फ्लॅट) उभारणार आहे. पुनर्विकासात पात्र रहिवाशांसह अपात्र आणि पात्र लाभार्थींना नेमकी कशी घरे देण्यात येणार याची कल्पना धारावीकरांना यावी यासाठी पाच नमुना सदनिका बांधण्याचा निर्णय ‘डीआरपीपीएल’ने घेतला आहे. लवकरच या नमुना सदनिकांच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अपात्र रहिवाशांसाठी धारावीबाहेर ३०० चौरस फुटांचे घर काही शुल्क आकारून दिले जाणार आहे. तर पात्र झोपडीधारकाला ३५० चौरस फुटांचे घर मोफत देण्यात येणार आहे. त्याच वेळी चाळी, खासगी, सरकारी इमारतीमधील पात्र रहिवाशांसाठीही पुनर्विकासाअतंर्गत देय क्षेत्रफळानुसार घरांची बांधणी करण्यात येणार आहे. त्यानुसार धारावी पुनर्विकासाचा आराखडा पूर्ण झाला आहे. पात्र झोपडीधारकांसह इतरांची घरे नेमकी कशी असतील हे या आराखड्यात निश्चित झाले आहे. शक्य तितक्या लवकर धारावी पुनर्विकासाला सुरुवात करण्याचे ‘डीआरपीपीएल’चे नियोजन आहे. त्यामुळे सर्वप्रथम धारावीतील रहिवाशांची घरे नेमकी कशी असतील याची कल्पना यावी यासाठी बीडीडी चाळ, रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाच्या धर्तीवर नमुना सदनिका तयार करण्यात येतील. त्यानुसार अपात्र रहिवाशांसाठी ३०० चौरस फुटांची, पात्र झोपडीधारकांसाठी ३५० चौरस फुटांची नमुना सदनिका बांधण्यात येतील.