मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक धीरज कुमार यांचे मंगळवारी, १५ जुलै रोजी मुंबईत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेले काही दिवस ते न्युमोनियाने आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

धीरज कुमार यांनी आपल्या अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत अनेक दशके गाजवली. त्यांनी १९६५ मध्ये ‘फिल्मफेअर टॅलेंट हंट’ स्पर्धेत भाग घेत मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि स्वतःमधील नानाविध कलागुणांच्या जोरावर मनोरंजनसृष्टीवर स्वतःची विशेष छाप सोडली. या स्पर्धेनंतर धीरज यांच्यासाठी चित्रपटसृष्टीची दारे खुली झाली. त्यानंतर ते अनेक जाहिरातींमध्ये झळकले. धीरज कुमार यांनी १९७० साली ‘दीदार’ चित्रपटाच्या माध्यमातून एक अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट दिले. ‘रातों का राजा’, ‘बहारों फूल बरसाओ’, ‘बिजली’, ‘शराफत छोड़ दी मैंने’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘फौजी’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘माँग भरों सजना’,‘शिर्डी के साई बाबा’, ‘कर्म युद्ध’ आदी विविध चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या महत्त्वपूर्ण भूमिका लक्षवेधी ठरल्या.

विशेष बाब म्हणजे कुमार यांनी १९७० ते १९८४ च्या दरम्यान तब्बल २१ पंजाबी चित्रपटांमध्ये काम करीत प्रादेशिक चित्रपटसृष्टीतही स्वतःची विशेष ओळख निर्माण केली. हिंदी, तसेच पंजाबी चित्रपटसृष्टी गाजवत असताना धीरज कुमार यांनी दूरचित्रवाणी क्षेत्रातही स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले. त्यांनी ‘क्रिएटिव्ह आय’ ही निर्मिती संस्था स्थापन करीत अनेक दर्जेदार दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांची निर्मिती केली आणि यापैकी अनेक कार्यक्रम घराघरात लोकप्रिय झाले. ‘क्रिएटिव्ह आय’ या निर्मिती संस्थेत ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. धीरज कुमार यांनी ‘ओम नमः शिवाय’, ‘जप तप व्रत’, ‘श्री गणेश’, ‘मिली’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘मन में है विश्वास’, ‘जय माँ वैष्णोदेवी’, ‘ये प्यार ना होगा कम’, ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’, ‘नादानियाँ’, ‘बेताल और सिंहासन बत्तीसी’, ‘इश्क सुभान अल्लाह’ आदी विविध दर्जेदार कार्यक्रम आणि मालिकांची निर्मिती केली.

धीरज कुमार यांची सोमवारी अचानक तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तात्काळ अंधेरीतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर एक सर्जनशील दृष्टिकोन असलेला कलाकार हरपल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त करण्यात येत आहे. धीरज कुमार यांच्या पार्थिवावर बुधवारी, पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.