मुंबई : मधुमेही रूग्णांमध्ये डायबेटिक फुट ची समस्या सध्या वाढताना दिसून येत आहे. पाच वर्षांहून अधिक काळ मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या रूग्णांमध्ये पाच ते सात रूग्णांना पायाच्या अल्सरचा सामना करावा लागतो. टाईप१ किंवा टाईप २ मधुमेहाने ग्रस्त व्यक्तींना ही समस्या उद्भवते. इतकंच नाही तर जवळपास ७० टक्के लोकांना डायबेटिस फूट अल्सरमुळे जीव गमवावा लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डायबिटिक फूट अल्सर म्हणजे पायांना अल्सर झाल्यामुळे स्किनचे टिशू तुटतात आणि त्याखालील स्किनची लेयर दिसू लागते आणि अल्सरवर वेळीच योग्य उपचार न केल्यास, एखाद्याला पाय कापावा लागू शकतो. चिंताजनक बाब म्हणजे, डायबिटिक फूट अल्सरमुळे अंगविच्छेदन करणाऱ्या अंदाजे ७० टक्के लोकांना जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे पायाच्या अल्सरवर त्वरित उपचार करणे महत्त्वाचे आहे आणि मधुमेहींसाठी ते जीवन वाचवणारे ठरू शकते असे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता व ज्येष्ठ सर्जन डॉ मोहन जोशी यांनी सांगितले.

हे ही वाचा…Mahim Assembly constituency : माहीममध्ये यंदा तिरंगी लढत? सदा सरवणकरांचा मार्ग खडतर? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, २०१९ मध्ये ७० दशलक्ष लोकांच्या तुलनेत भारतात आता १०१ दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. किमान १३६ दशलक्ष लोकं (लोकसंख्येच्या १५.३ टक्के) प्रीडायबिटीज आहेत आणि ३१५ दशलक्ष पेक्षा जास्त लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-इंडिया डायबिटीज’ मधील शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर आढळून आलेली ही आकडेवारी चिंताजनक असून याकडे त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे. भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण आहेत असून जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढतेतेव्हा अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो.

फुट अँण्ड अंकल सर्जन डॉ. श्याम ठक्कर म्हणाले की, मधुमेहामुळे पायाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे न्यूरोपॅथीची समस्या उद्भवू शकते, ज्यामध्ये मज्जातंतूंचे नुकसान होते व पायांमध्ये संवेदना कमी होतात. कमी झालेली संवेदनशीलतेमुळे अनेकदा दुखापती आणि फोडांवर लक्ष दिले जात नाही व ते पायाच्या अल्सरसारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण करते. मधुमेह-संबंधित पायाच्या जखमा, फोड हे मधुमेह असलेल्या सुमारे २० टक्के लोकांना त्रासदायक ठरु शकते. ज्या ठिकाणी पायांचे घर्षण होते किंवा बुटांमुळे दाबले जातात तेव्हा अल्सर विकसित होतात. वेळीच हा संसर्ग दूर न झाल्यास एखाद्याला पाय कापण्याची आवश्यकता भासते. म्हणजे तुमच्या पायाचा काही भाग शस्त्रक्रियेने काढून टाकणे आवश्यक बनते.

मधुमेह आहे अशा पाच ते सात रूग्णांमध्ये पायाला जखम होतात आणि त्यांना मुंग्या येतात, सूज येते किंवा वेदना होतात, दुर्गंधी येते ,पाण्याचा स्राव होतो, बरे होत नसलेल्या फोडांमधून पू बाहेर येणे यासारखी लक्षणे दिसतात. नखं पिवळी पडणे, कोरडी आणि भेगा पडलेली त्वचा. अनेकदा मधुमेहींना पायाच्या अल्सरमुळे, पाय कापल्यानंतर जीव गमवावा लागू शकतो. पाय कापून टाकणे हे आयुष्यभरासाठी अपंगत्वास कारणीभूत ठरते. यामुळे दैनंदिन क्रिया करण्यासाठी देखील इतरांवर अवलंबून रहावे लागते, असे डॉ मोहन जोशी म्हणाले.

डायबेटिक फूट सर्जन डॉ राजीव सिंग म्हणाले की, “पायाचे अल्सर हे मधुमेही लोकांसाठी अतिशय धोकादायक आहे. त्वरीत निदान न केल्यास पायांवर किरकोळ दुखापत किंवा जखमा अल्सर होऊ शकतो. मधुमेह असलेल्या सुमारे पंधरा टक्के लोकांना या जीवघेण्या गुंतागुंतीचा त्रास होऊ शकतो, हे व्रण संक्रमित होऊ शकतात. यामुळे पाय काढून टाकावा लागू शकतो. एका महिन्यात ३०-५५ वयोगटातील २० रूग्णांमध्ये, ज्यांना मधुमेह आहे त्यापैकी तीन ते चार जणांना पायात अल्सर होऊ शकतो आणि त्यांना दुर्गंधी आणि पाण्याचा स्त्राव, पू होणे आणि रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसू शकतात. मधुमेही पायाच्या अल्सरमुळे सुमारे ५० टक्के लोक विच्छेदनानंतर जीव गमावू शकतात. त्यामुळे मधुमेही रूग्णांनी पायाच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. अचानक वेदना, लालसरपणा किंवा पायाला सूज असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”

हे ही वाचा…Ratan Tata: गरिबांचा कैवारी! रतन टाटांनी जेव्हा पेपरवाल्याला केली होती ५ लाखांची मदत, २० वर्ष घरी वर्तमान पत्र देणाऱ्याने सांगितली आठवण

मधुमेहींना नेहमी सावध राहण्याचा सल्ला दिला जातो आणि पायात दुखणे किंवा जखम, लालसरपणा, दुर्गंधी, सूज यासारख्या कोणत्याही समस्या आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. ही स्थिती वेळीच ओळखणे आणि त्वरित निदान केल्यास पाय कापावा लागत नाही. जखम स्वच्छ ठेवणे, ॲंटिबीयोटिक मलम वापरणे, आहार, व्यायाम आणि औषधोपचार यांच्या मदतीने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे आणि योग्य शूजची निवड करणे आवश्यक आहे. पायाच्या संसर्गावर वेळीच उपचार न केल्यास ते गँगरिनलाही आमंत्रण देऊ शकते, म्हणजे रक्तपुरवठ्याच्या कमतरतेमुळे ऊतींचा मृत्यू होतो आणि ते जीवघेणे ठरू शकते. त्वचेचा रंग बदलणे, त्वचेला सुज येणे, तीव्र वेदना, फोड येणे आणि दुर्गंधीयुक्त पू होणे ही गँग्रीनची लक्षणे आहेत. जर तुम्हाला मधुमेहाचा वैद्यकिय इतिहास असेल तर सावधगिरी बाळगणे आणि पायांची काळजी घेणे आवश्यक आहे. पायाची काळजी ही मधुमेह व्यवस्थापनातील एक महत्त्वाची बाब आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. पायांची नियमित तपासणी केल्याने पाय निरोगी राहतील असेही डॉ मोहन जोशी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetics foot ulcers problem increasing in diabetic patients mumbai print news sud 02