मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील ‘एम.कॉम’च्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होऊन सहा महिने उलटले तरी गुणपत्रिका मिळालेली नाही. तसेच, विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचीही प्रतीक्षा आहे. या गोंधळामुळे नोकरी मिळवताना विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राने (‘सीडीओई’ पूर्वीचे आयडॉल) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतर्गत पदव्युत्तर द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची (एम.कॉम.) तृतीय सत्र परीक्षा २८ मार्च ते १० एप्रिल २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १८ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. तसेच, चौथ्या सत्राची परीक्षा ७ ते २६ जुलै २०२३ या कालावधीत घेण्यात आली आणि या परीक्षेचा निकाल हा १२ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, जवळपास ६ महिन्यांचा कालावधी लोटूनही विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा >>>पश्चिम रेल्वेवर शनिवारी, मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक

‘एम.कॉम.’च्या द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर होऊन सहा महिने झाले. मात्र, अद्यापही माझ्याकडे तृतीय व चौथ्या सत्र परीक्षेची गुणपत्रिका नाही. मी विविध ठिकाणी नोकरीसाठी गेलो होतो, मात्र अंतिम वर्षातील सत्र परीक्षांच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र नसल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही,’ अशी खंत एका विद्यार्थ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली.

‘एकीकडे मुंबई विद्यापीठ विविध सत्र परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर केल्याचे सांगत स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. मात्र, दुसरीकडे निकाल जाहीर होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेली नाही. मग निकाल लवकर जाहीर होऊन फायदा काय? तसेच मुंबई विद्यापीठाच्याच अधिकाऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून रत्नागिरी उपपरिसरात गुणपत्रिका पोहोचत नसतील, तर मग विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय देणे ही दूरची गोष्ट आहे. या गोंधळाबाबत कुलगुरूंना पत्र दिले आहे. तसेच, एमएमएस आणि इतर अभ्यासक्रमांबाबत सतत पाठपुरावा करून संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा >>>सागरी किनारा मार्गाची एक वाहिन जुलैअखेर सुरू करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

रत्नागिरी उपपरिसरात गुणपत्रिका पोहोचल्याच नाहीत

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरात ‘सीडीओई’च्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाते. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ द्वितीय सत्र २०२२ पासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका अद्यापही रत्नागिरी उपपरिसरात पोहोचलेल्या नाहीत. यासंदर्भात, रत्नागिरी उपपरिसरातील अधिकाऱ्यांनी वारंवार ‘सीडीओई’कडे पत्रव्यवहार करूनही त्यांनाच सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

 ‘एम.कॉम.’ अभ्यासक्रमाच्या तृतीय व चौथ्या सत्राच्या गुणपत्रिका या छापून पूर्ण झाल्या आहेत आणि सध्या गुणपत्रिकांची व्यवस्थित क्रमवारी लावली जात आहे. विविध कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले जातात, त्यामुळेही गुणपत्रिकांचे वितरण करण्यास विलंब होतो. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांत रत्नागिरी उपपरिसरात गुणपत्रिका उपलब्ध केल्या जातील.- डॉ. पूजा रौंदळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ