मुंबई : सर्वसामान्य गुंतवणूकदारांची ४ कोटींची फसवणूक करून फरार झालेल्या गोरेगाव येथील सराफाला दिंडोशी पोलिसांनी सात महिन्यांनंतर नाट्यमयरित्या अटक केली. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो ओळख बदलून राजस्थान येथे रहात होता. गुंतवणूकदारांच्या फसवणुकीतून मिळालेल्या रकमेतून त्याने राजस्थानमध्ये एक ढाबा सुरू केला होता. पोलिसांनी ग्राहक बनून ढाब्यातच सापळा रचला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली.

कुशल दलपतसिंग राठोड उर्फ कमलेश चौहान (३०) असे या सराफाचे नाव आहे. त्याने गोरेगाव पूर्व परिसरातील संतोष नगर मार्केटमध्ये श्री ज्वेलर्स नावाने दुकान उघडले होते. दागिने आणि रोख रक्कमेच्या गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली त्याने विविध योजना जाहीर केल्या होत्या. १२ महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास ४ महिन्यांचा बोनस, गुंतवणूक केलेल्या रकमेएवढे सोन्याचे दागिने अशा या योजना होत्या. तसेच रोख रक्कम गुंतविल्यास चांदिच्या दागिन्यांवर ५० टक्के सवलत केडीए, हॉल मार्क सोन्याचे दागिने विनामूल्य बनवून दिले जातील, अशी विविध प्रलोभने त्याने दाखवली होती.

त्याच्या या योजनांना भुलून ९० गुंतवणूकदारांनी २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत गुंतवूणूक केली होती. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी विशेष दिवाळी बोनस, लॉटरी सोडत काढली जाईल अशा भूलथापाही त्याने मारल्या होत्या. परंतु गुंतवणूकदार १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याच्या दुकानात पोहोचले. तेव्हा तो दुकान बंद करून पळून गेला होता. त्याने आपला मोबाइल फोनही बंद केला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुंतवणूकदारांची त्याने एकूण ४ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कुशल दलपतसिंग राठोड उर्फ कमलेश चौहान याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

फसवणूकीच्या पैशातून उघडला ढाबा

पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, पोलीस उपनिरीक्षक अजित देसाई आदींच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला होता. कुशल दलपतसिंग राठोड उर्फ कमलेश चौहान नाव बदलून राजस्थानला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथील जालौर जिल्ह्यातील धवल गावात त्याने ‘जैसलमैर की झलक’ नावाने एक ढाबा सुरू केला होता. मात्र पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी त्याने तेथे आपली बनावट ओळख तयार केली होती.

पोलिसांचे पथक या ढाब्यात ग्राहक बनून गेले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याचे मूळ नाव कुशल राठोड असून मुंबईत तो कमलेश चौहान नावाने वावरत होता. त्याने या पैशांतून जमीनही विकत घेतली होती. त्याची चौकशी केली असताने त्याचे अन्य दोन साथीदारांची नावे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी विनायक माने (४०) आणि सिबराम सावंत (४७) या दोघांना अटक केली. त्यांचे अन्य दोन साथीदार फरार आहेत. गुंतवणूकदारांकडून घेतलेले सोने वितळून तो विकत होता. माने आणि सावंत यांच्या मदतीने तो हे काम करीत होता.