मुंबई : पश्चिम उपनगरातील कांदिवली येथील मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालयात (शताब्दी) दिव्यांगत्व तपासणी, मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षामध्ये अस्थिव्यंग, कान, डोळे आणि कुष्ठरोग या चार बाबींसंदर्भात अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामुळे जोगेश्वरी – दहिसर व वसई, विरारमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दहिसरपासून जोगेश्वर आणि मिरा रोड, वसई या परिसरातील दिव्यांग नागरिकांना अपंग प्रमाणपत्र मिळविण्यााठी कूपर किंवा जे.जे. रुग्णालयामध्ये जावे लागते. त्यामुळे या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयामध्ये अपंग प्रमाणपत्र केंद्र सुरू केले आहे. मागील आठवड्यात हे केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रामध्ये नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे पुन:प्रशिक्षण सुरू असल्याने दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे.
या केंद्रामध्ये सुरुवातीला अस्थिव्यंग, कान, डोळे आणि कुष्ठरोग यासंदर्भातील प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी या व्यक्तींना ‘यूनिक डिसॅबिलिटी आयडी’ देण्यासाठी असलेल्या सरकारच्या संकेतस्थळावरून नोंदणी करायची आहे. यामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना प्रत्येक बुधवारी तपासणीसाठी रुग्णालयामध्ये बोलविण्यात येणार आहे. त्यानुसार अस्थिव्यंग, कान, डोळे आणि कुष्ठरोग या चार बाबींबाबत रुग्णांची तपासणी करताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी एका कक्षसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही व्यक्ती रुग्णांना संबंधित विभागामध्ये नेऊन त्यांची तपासणी करून त्याचा अहवाल विभागामध्ये सादर करण्यास मदत करणार आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना रुग्णालयामध्ये तपासणीदरम्यान होणारा त्रास कमी होईल.
या केंद्रामुळे जोगश्वरीपासून विरारपर्यंतच्या दिव्यांग व्यक्तींना कूपर रुग्णालयाऐवजी कांदिवलीमध्येच प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच कूपर रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. – डॉ. चंद्रकांत पवार, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, महानगरपालिका रुग्णालये
एका दिवशी होणार तीन ते चार व्यक्तींची तपासणी
रुग्णालयात सुरू करण्यात आलेले केंद्र प्राथमिक अवस्थेत आहे. अनेकदा काही व्यक्ती बनावट व्यंग दाखवून प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच कोणाला चुकीचे प्रमाणपत्र दिले जाऊ नये यासाठी सुरुवातीला एका आठवड्यामध्ये तीन ते चार दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचा अनुभव वाढल्यावर रुग्ण तपासणीच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे.
भविष्यात अन्य दिव्यांग प्रमाणपत्र ही मिळणार
शताब्दी रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने फक्त चार प्रकारचे प्रमाणपत्र देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. पुढील दोन वर्षांमध्ये ३२५ खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू झाल्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील. त्यामुळे अन्य दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधाही उपलब्ध करता येणार आहे.