मुंबई : अंधेरी येथील विकासक चंद्रकांत भुनू (५५) यांच्या अपहरणाबाबत अखेर उलगडा झाला आहे. रविवारी रात्री ४ अज्ञात व्यक्तीनी त्यांचे अपरहरण केले होते. याबाबत त्यांच्या पत्नीने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अपहरणामुळे खळबळ उडाली होती. सोमवारी पोलिसांनी या अपहरण नाट्याचा छडा लावला.. पण जे कारण समोर आले ते मात्र मजेशीर होते…

मध्यरात्री झाले अपहरण

विकासक चंद्रकांत भुनू (५५) दुसरी पत्नी अफसाना अरब (३६) आणि तीन मुलांसह अंधेरीच्या चार बंगला परिसरात राहतात. रविवारी ५ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजता चार जण त्यांच्या घरी आले. साहेबांनी बोलावले आहे, असे त्यांना सांगितले. भुनू यांनी कुठे जायचे आहे? असे विचारले. पण त्यांनी उत्तर दिले नाही. मी मोटारसायकलीने वर्सोवा स्क्वेअरपर्यंत येईन असे भुनू यांनी सांगितले होते. सुरवातीला त्यांना काही कामाचा भाग असेल असे वाटले होते. मात्र त्या व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने पांढऱ्या कारमध्ये बसवले आणि तेथून निघून गेले. त्यानंतर अफसाना यांनी भुनू यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की ते ४ अनोळखी लोकं त्यांना वसईकडे घेऊन जात आहेत. त्यानंतर भुनूंचा फोन बंद झाला. हा सगळा प्रकार संशयास्पद होता. अपहऱणकर्ते ३५ ते ४० वर्ष वयोगटातील होते. अफसाना यांनी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली..

अपहरणाचा गुन्हा दाखल

विकासक चंद्रकांत भुनू यांचे अपहरण झाल्याची तक्रार दुसरी पत्नी अफसाना हिने पोलीस ठाण्यात केली होती. भुनू आणि त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा वैभव यांच्यात मालमत्तेविषयी नेहमी वाद होत असतात. त्यामुळे या अपहणामागे त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार वर्सोवा पोलिसांनी ४ अज्ञात चार व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

विकासक आढळले वसईतील केंद्रात

वर्सोवा पोलिसांनी तांत्रिक तपास करून भुनूंचा ठावठिकाणा शोधून काढला. ते वसईतील एका पुनर्वसन केंद्रात दाखल असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यांचे अपहरण झाले नव्हते. भुनू हे मद्यपी होते. त्यांना उपचाराची गरज होती. त्यामुळे त्यांच्या पहिल्या पत्नीने वसईतील पुनर्वसन केंद्रात दाखल केले होते. ते पुनर्वसन केंद्रात यायला तयार नसल्याने पत्नीने ४ जणांना घेण्यासाठी पाठवले होते. ते ४ ‘ अपहरणकर्ते’ हे त्या केंद्रातील कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.