समाधानकारक ते मध्यम पातळीवर
दिवाळीच्या दिवसात फटाक्यांच्या प्रदूषणात मागील वर्षांपेक्षा बरीच घसरण झाली असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक ते मध्यम पातळीवर राहिल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. हवेचे प्रदूषण वाढवणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर बरेच नियंत्रण आल्याचे त्यातून दिसून येते.
मंडळातर्फे औरंगाबाद, चंद्रपूर, कल्याण, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे आणि नागपूर या दहा ठिकाणी दिवाळीत हवेच्या प्रदूषणाची पातळी मोजण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुणवत्ता निर्देशांकांत मागील वर्षांच्या तुलनेत मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी घट झाली असून, तो मध्यम पातळीवरून समाधानकारक पातळीवर आला. चंद्रपूर येथे निर्देशांकात मोठी घट झाली असून ९० वरून २२ वर आला. सोलापूर येथे मात्र निर्देशांकात वाढ झाली असून ७८ वरून ११५ पर्यंत पोहचला.
भाऊबिजेच्या दिवशी मागील वर्षांच्या तुलनेत औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर या ठिकाणी गुणवत्ता निर्देशांकात घट झाली असून मध्यमवरून समाधानकारक पातळीवर पोहचला. नाशिक येथे मागील वर्षी या दिवशी निर्देशांक १४२ होता, तर यावर्षी त्यात मोठी घट होऊन ३१ या चांगला पातळीपर्यंत आला. तर नागपूर, मुंबई या ठिकाणी भाऊबिजेच्या दिवशी मागील वर्षांच्या तुलनेत फारसा बदल झाला नाही.
गेल्या सात वर्षांपासून मंडळातर्फे फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जात असून, लोकांमध्ये याबाबत सजगता आली आहे. विशेषत: शालेय मुलांमध्ये ही जागरूकता आली असल्यामुळे प्रदूषणात घट झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी सांगितले.
हवेचा गुणवत्ता निर्देशांक
- ० ते ५० चांगला
- ५१ ते १०० समाधानकारक
- १०१ ते २०० मध्यम
- २०१ ते ३०० वाईट
- ३०१ ते ४०० अत्यंत वाईट
- ४०१ पेक्षा गंभीर, धोकादायक
- अधिक
