मुंबई : महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकले असून या कारवाईत महागड्या लाकडी वस्तूच्या आयातीतून ३० कोटी रुपयांची सीमाशुल्क फसवणूक उघड करण्यात डीआरआयला यश आले आहे. दोन दिवस करण्यात आलेल्या या कारवाईत डीआरआयने तिघांना अटक केली असून आरोपींविरोधात सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीआरआयला यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर मुंबईतील व्यापारी कार्यालय, गोदाम, फ्रेट फॉरवर्डर्स आणि सीमाशुल्क दलाल कार्यालयांवर सखोल तपासणी करण्यात आली. त्यावेळी तपासात एक नामांकित फर्निचर कंपनी इटली व युरोपमधून फर्निचरची आयात करीत होती. मात्र या आयातीत दुबईतील बनावट कंपन्यांचा वापर करण्यात येत होता. त्यासाठी बनावट पावत्यांचाही वापर करण्यात येत होता. थेट युरोपातून या वस्तूंची आयात करण्यात येत होती. सिंगापूरस्थित दलालाच्या माध्यमातून बनावट चलन तयार करून माल ‘नो-ब्रँड’ फर्निचर म्हणून कमी किमतीत दाखवण्यात येत होता आणि बनावट आयातदाराच्या नावाने त्या वस्तू मागवण्यात येत होता. सीमाशुल्काची प्रक्रिया झाल्यानंतर सर्व वस्तू स्थानिक दलालाच्या मदतीने आयातदाराकडे हस्तांतरित केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात येत होते. प्रत्यक्षात वस्तू थेट ग्राहक किंवा मूळ कंपनीकडे पाठवण्यात येत होत्या, अशी माहिती डीआरआयकडून देण्यात आली.

तपासात काय निष्पन्न झाले ?

सर्व व्यवहारात किमतीत ७० ते ९० टक्के कपात दाखवल्यामुळे किमान ३० कोटींचा सीमाशुल्क फसवणूक केल्याचा संशय आहे. त्यासाठी बनावट आयातदार, दलाल आणि लाभार्थी कंपनी यांच्यात संगनमत होते. त्यासाठी बनावट कागदपत्रे, पावत्या आणि कंपन्यांचा वापर करण्यात येत होता. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.यापूर्वीही असाच प्रकार घडला होता.

मे २०२५ मध्ये असाच प्रकार डीआरआयने उघड केला होता. त्यात बनावट कंपनीच्या नावाने महागड्या लाकडी वस्तू आयात करण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणात २० कोटींहून अधिक सीमाशुल्क चोरी करण्यात आल्याचे उघड झाले होते. त्याप्रकरणातही बनावट कंपन्या, आयातदारांचा वापर करण्यात आला होता. सध्या डीआरआय नव्या प्रकरणातील मुख्य आरोपी व आर्थिक व्यवहारांबाबत सखोल तपास करीत आहेत. आरोपींनी ३० कोटी सीमाशुल्क फसवणूक करून सरकारचे नुकसान केले आहे. याप्रकरणात काही आरोपी परदेशात असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.