मुंबई: चेंबूरमधील स्वामी विवेकानंद महाविद्यालय परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका बंद मोटारगाडीत चालकाचा मृतदेह चुनाभट्टी पोलिसांना सापडला. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पांडुरंग नराळे (४८) असे मृत चालकाचे नाव असून ते चेंबूरच्या कोकण नगर परिसरात वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी येथील सिंधी सोसायटी परिसरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाजवळ त्यांची मोटारगाडी उभी केली होती. त्यानंतर ते याच गाडीत आराम करत होते.

ही बाब परिसरातील एका गॅरेज चालकाने पहिली होती. मात्र पांडुरंग शुक्रवारी सायंकाळी याच गाडीत आढळल्याने त्याला संशय आला. त्याने दरवाजा ठोकून चालकाला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गॅरेज चालकाने याबाबतची माहिती चुनाभट्टी पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोटारगाडीचा दरवाजा उघडून मृतदेह बाहेर काढला. पांडुरंग यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून आद्याप चालकाच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही, अशी माहिती चुनाभट्टी पोलिसांनी दिली.