मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकलमधील महिलांच्या डब्यात चढून असभ्य वर्तन करणाऱ्या मद्यपीविरोधात वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डब्यातून प्रवास करणाऱ्या तरुणीने घटनेची चित्रफीत तयार करून समाजमाध्यमावर प्रसारित केली होती. हा प्रकार शनिवार, १४ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडला.
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाकडे (सीएसएमटी) जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये चुनाभट्टी स्थानकात एक अनोळखी मद्यपी चढला होता. तो महिलांसमोर अश्लील कृत्य करीत होता. त्याला काही महिलांनी हटकले. याच डब्यातून प्रवास करणाऱ्या एका तरुणीने ही घटना मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केली. महिलांनी विरोध केल्यानंतर तो गुरू तेग बहादूर स्थानकात उतरला आणि नंतर दुसऱ्या डब्यात चढला. तरुणीने याबाबत एक्स या समाजमाध्ममावर ती चित्रफीत प्रसारित केली. तिने याबाबत मंगळवारी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात विनयंभगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.