मुंबई – पावसाळ्यातील वातावरण हे सतत बदलत असते. हे वातावरण कधी ओले असते, शिवाय कधी आर्द्र तर कधी कोरडे, तर कधी थंड असते. त्यामुळे संसर्गाच्या वाढीसाठी हे वातावरण अगदी पोषक ठरत असते. पावसाळ्यात ४ ते १६ वयोगटातील शाळकरी मुलांमध्ये ओटिटिस मीडिया सारख्या कानाच्या संसर्गास तर २४-६५ वयोगटातील प्रौढांमध्ये घशाचा संसर्गांचे प्रमाण वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
दमट हवामानात जीवाणु मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे ते जीवाणूजन्य संक्रमणाला आमंत्रण देतात. ज्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि सीझनल एलर्जी होऊ शकते. पावसाळ्याच्या दिवसात कान, नाक आणि घशासंबंधीत तक्रारी वाढतात. वाढलेली आर्द्रता, तापमानातील चढउतार हे संसर्गास कारणीभूत ठरतात.
४ ते १५ वयोगटातील मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे त्यांना अशा संसर्गाचा धोका अधिक असतो. डे केअर आणि शाळकरी मुलांमध्ये संसर्ग पसरण्याचे प्रमाण देखील इतर वयोगटातील व्यक्तींच्या तुलनेने अधिक असते, असे ठाण्यातील डॉक्टर परग देशपांडे यांनी सांगितले.त्यामुळे पावसाचे पाणी तुमच्या कानात जाणार नाही याची खबरदारी घ्या, आपले कान कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. धुळीच्या किंवा बुरशीजन्य वातावरणाचा संपर्क टाळा असेही डॉ देशपांडे म्हणाले.
हवामानातील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. कानात जमा होणाऱ्या मळातील ओलावा हा जिवाणू किंवा बुरशी वाढीसाठी पावसाळ्यातील वातावरण उत्तम ठरते. जिवाणूंमुळे कानासंबंधीत संसर्ग वाढवतो. सर्दी आणि फ्लू सोबत, अगदी किंचित ऍलर्जीमुळे संक्रमण होऊ शकते. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लूएंझा यांसारखे जीवाणू हे कानाच्या संसर्गाचे मुख्य कारण आहेत. ॲलर्जी दमा किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती, लहान मुलं तसेच २५ ते ६५ वयोगटातील व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक असते असे मुंबईतील कान,नाक,घसा तज्ज्ञ डॉ. श्रुती शर्मा यांनी सांगितले.
कानाच्या संसर्गामध्ये स्वीमर्स इअर हा असा संसर्ग आहे ज्यात पावसात भिजल्याने कानात पाणी जाणे, स्विमिंग करताना किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेल्याने संसर्ग होणं. जेव्हा आपला कान जंतूंनी भरलेल्या पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा हे इन्फेक्शन होते. स्वीमर्स ईअर तेव्हाच होतो जेव्हा कानात पाणी जास्त असते. कानाच्या संसर्गामुळे कानात वेदना होतात.
ओटिटिस मीडिया ही कानातील मधल्या भागाचा संसर्ग आहे. याला मिडल इअर इन्फेक्शन असेही म्हणतात. पावसात भिजल्यामुले सर्दी आणि खोकला सुरू होतो. या काळात तापमान आणि आर्द्रतेतील बदलांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, थकवा आणि सामान्य अशक्तपणा यांसारख्या समस्या सामान्य होतात. पावसाचे पाणी तुमच्या कानात जाणार नाही याची खबरदारी घ्या, आपले कान कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा.
धुळीच्या किंवा बुरशीजन्य वातावरणाचा संपर्क टाळा. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि हायड्रेशनने रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे, कान कोरडे ठेवणे, कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळणे आणि पुरक आहाराने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचा सल्ला देखील शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी सांगितले.