मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जुने ऋणानुबंध असून विकासासाठी अन्य राज्यांप्रमाणे डबल इंजिन सरकारचे सूत्र कर्नाटकमध्येही कायम ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी बंगळूरु येथे केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शिंदे तेथे गेले आहेत. त्या निमित्ताने बंगळूरु येथील १०३ वर्षे जुन्या असलेल्या महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून शिंदे यांनी मराठी बांधवांशी संवाद साधला.
जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी आपली माणसे भेटल्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान वाटते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कर्नाटकात महाराष्ट्र भवन सुरू करून आजवर वेगवेगळय़ा उपक्रमाद्वारे मराठी भाषा, संस्कृती, परंपरांचे जतन संवर्धन केल्याबद्दल सर्व मराठीजनांचे शिंदे यांनी कौतुक केले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, बंगळूरुचे खासदार लहरसिंह सिरोया, अभिनेते भरत जाधव, बंगळूरुमधील महाराष्ट्र भवनाच्या अध्यक्ष माणिक पटवर्धन आदी उपस्थित होते.