परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना आज ( १४ नोव्हेंबर ) बालदिनाची अनोखी भेट मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत येत मुलांशी गप्पा मारल्या. त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट उत्तरे देताना मी याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक होऊन शाळेच्या आठवणी जागवायला आल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुमारे तासभर चाललेल्या या बालदिनाच्या अनोख्या सोहळ्यात मुख्यमंत्री मुलांसोबत रमले. त्यांच्यासोबत सेल्फी घेताना तेही त्यांच्यातलेच एक होऊन गेले. पांढऱ्या रंगाचे कपडेच का घालतात? दाढी का ठेवतात? शिक्षकांचा मार खाल्ला होता का? अशा मुलांच्या भन्नाट प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांनी खुमासदार उत्तरे दिली.

हेही वाचा : “पोलीस नियमांनुसार कारवाई करतील”, जितेंद्र आव्हाडांवरील गुन्ह्यावरून मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय…”

बालदिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले, “एक विद्यार्थी म्हणून मी आज इथे माझ्या शाळेतल्या आठवणी जागवायला आलो आहे. बालपण महत्वाचं असून, त्यातला निरागसपणा सर्वांनी जपावा. मोठं झाल्यावर जबाबदाऱ्या येतात त्यामुळे लहानपण देगा देवा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. अभ्यास करताना दडपण घेऊ नका,” असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शिक्षकांचा मार खाल्ला का?

मुख्यमंत्री शिंदेंना मुलांनी बिनधास्तपणे मनातले प्रश्न विचारले. त्यालाही त्यांनी तितक्याच मोकळेपणाने उत्तरे देखील दिली. एका विद्यार्थीने मुख्यमंत्र्यांना आई-बाबांचा, शिक्षकांच्या हातचा मार खाल्ला का? असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री हसले आणि त्यांनी ठाण्यातील किसननगर मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधील आठवणी सांगितल्या. ‘रघुनाथ परब नावाचे शिक्षक कसे शिक्षा करायचे’ याचा अनुभव सांगतानाच ‘लहानपणापासून दुसऱ्याला मदत करण्याची आवड होती. समाजकारणातून राजकारणात आलो,’ असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

“लग्नासाठी काढली दाढी”

तुम्ही दाढी का करत नाही?, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. “माझे गुरू धर्मवीर आनंद दिघे दाढी ठेवायचे, त्यामुळे मी देखील दाढी ठेवली. लग्नाच्या वेळेस दाढी काढल्याचे सांगतानाच, दाढीची कमाल आणि किमया सगळ्यांना माहित आहे,” असेही मिष्कीलपणे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

हेही वाचा : “माझ्या खुनाचा कट रचला असता, तरी चाललं असतं पण…”, विनयभंगाच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाडांचा कंठ दाटला

“पांढरा रंग आवडतो कारण…”

पांढरा रंग का आवडतो? हे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, “पांढरा रंग सर्व रंगात सामावून जातो. तर, मराठी शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मुलांचा ओढा वाढला पाहिजे. स्पर्धात्मक जगात मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील,” असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

“मैदानी खेळ खेळावेत”

“मला फुटबॉल, क्रिकेट खेळायला, पाहायला आवडतात. मैदानी खेळ नेहमी खेळायचो. आता मोबाईलच्या जमान्यात देखील विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत. विद्यार्थी भविष्य असून ते या देशाचे, राज्याचा पाया असल्याचे सांगत विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्याचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde talk chindren shirodkar high school in paral over children day ssa