मुंबई : काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात खासगी वाहनाला आग लागली होती. या घटनेचा विविध स्तरातून निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने उद्यानात इलेक्ट्रीक वाहने सुरू करण्याची हालचाल सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय उद्यानात खासगी वाहनांवर पूर्ण बंद घालण्यात येणार असून केवळ राष्ट्रीय उद्यानाचीच विद्युत वाहने उद्यानात धावणार आहेत.

राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून कान्हेरी गुंफेपर्यंत प्रवाशांची वाहतूक खासगी वाहनांमधून करण्यात येत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी उद्यान परिसरात एका खासगी वाहनाला आग लागली होती. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीनंतर उद्यानातील सुरक्षेच्या नियमांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

दरम्यान, या घटनेनंतर आता राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने प्रवेशद्वारापासून कान्हेरी गुंफेदरम्यान प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी विद्युत वाहने आणण्याचे ठरवले आहे. सध्या विद्युत वाहनांची निवड प्रक्रिया सुरू आहे. साधारण १५ दिवसांत वाहनाची संख्या आणि इतर संबंधित गोष्टी आदींबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर हा निर्णय अंमलात आणला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानात खासगी ओमनी गाड्या प्रवासी वाहतूक करीत आहेत. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांच्या खासगी वाहनांना बंदी करण्यात आली. मात्र प्रवेशद्वारापासून कान्हेरी गुंफेदरम्यान खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. या वाहनांमधून पर्यटकांना उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून कन्हेरी गुफेपर्यंत सोडण्यात येत आहे. यामध्ये उद्यान प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नव्हता.

काही दिवसांपूर्वी घडलेल्या आगीच्या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यानंतर उद्यान प्रशासन सतर्क होऊन त्यांनी विद्युत वाहनांचा पर्याय निवडला आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रीय उद्यानात विद्युत वाहनांची सेवा सुरू करण्यात येईल. याबाबतचे सर्व निर्णय उद्यान प्रशासनाकडून घेतले जातील.