मुंबई : देशाला आण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या पोखरण १ आणि पोखरण २ अणुचाचण्यांमध्ये मोलाची भूमिका बजावणारे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ, क्रिस्टलोग्राफर डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी पहाटे ३.२० च्या सुमारास निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. चिदंबरम यांनी शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या कारकिर्दीत भाभा अणु संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक, अणुऊर्जा आयोगाचे (एईसी) अध्यक्ष, आणि अणुऊर्जा विभागाचे (डीएई) सचिव म्हणून काम केले. १९९४ ते ९५ या कालावधीत ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) गव्हर्नर्स मंडळाचे अध्यक्ष होते. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही डॉ. चिदंबरम यांनी काम पाहिले होते. भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावताना डॉ. चिदंबरम यांनी १९७५ मधील पोखरण १ आणि १९९८ मधील पोखरण २ या चाचण्यांमध्ये समन्वयाकाची भूमिका बजावली होती. डॉ. चिदंबरम यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला गती दिली. डॉ. चिदंबरम यांना १९७५ मध्ये पद्मश्री आणि १९९९ मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी भारत सरकारने सन्मानित केले.

हेही वाचा – बोरिवली आणि भायखळ्यातील हवा सुधारली, निर्बंध उठवण्याची शक्यता, नेव्हीनगर आणि शिवाजीनगरवर लक्ष

हेही वाचा – मुंबई : आदेश देऊनही बेकायदा झोपड्यांवर कारवाई नाही, महापालिकेचा माजी सहाय्यक आयुक्त अवमानप्रकरणी दोषी

आर. चिदंबरम यांचा मिळालेले पुरस्कार

बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार (१९९१), इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा सी. व्ही. रमण जन्मशताब्दी पुरस्कार (१९९८), लोकमान्य टिळक पुरस्कार (१९९८), वीर सावरकर पुरस्कार (१९९९), दादाभाई नौरोजी मिलेनियम पुरस्कार (१९९९), भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे मेघनाद साहा पुरस्कार (२००२), श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठीत पुरस्कार (२००३), इंडियन न्यूक्लियर सोसायटीचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार (२००६), इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचा अभियांत्रिकीमधील जीवनगौरव योगदान पुरस्कार (२००९), भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सी. व्ही. रमण पुरस्कार (२०१३), ऊर्जा उपयोगिता परिषदेचा जीवनगौरव पुरस्काराने (२०१४) त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eminent nuclear scientist rajagopal chidambaram passed away mumbai print news ssb