मुंबई – घराच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी (मूव्हर्स ॲण्ड पॅकर्स) सामानातील साडेसहा लाखांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार शीव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी शीव पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी श्रध्दा मेहता (५५) या पती धर्मेश मेहता (५८) यांच्यासह शीव येथील दोस्ती एलाईट येथील इमारतीत २०२२ पासून भाड्याने राहतात. त्यांची मुले परदेशात नोकरी करतात. त्यांच्या घराचा करार संपल्याने घर रिकामे करायचे होते. फिर्यादी यांच्या दिराचे घर शीव येथील तमीळ संघम रोड येथील शांती टॉवरमध्ये आहे. त्यामुळे मेहता दांपत्याने तेथे राहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता.
नजर चुकवून दागिने लंपास
फिर्यादी मेहता यांनी १५ ऑक्टोबर रोजी घरगुती सामानाची वाहतूक करणाऱ्या (‘मूव्हर्स ॲण्ड पॅकर्स’) एका व्यक्तीशी संपर्क साधला. त्याने सामान बांधून ठेवण्यासाठी काही खोके पाठवले. त्यानुसार मेहता दांपत्याने खोक्यांमध्ये सामान भरून ठेवले. फिर्यादी श्रध्दा मेहता आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या विद्या सावंत या महिलेचे दागिने एका प्रवासी बॅगेत भरून ठेवले होते. त्यानुसार मेहेता यांनी संपर्क साधलेला व्यवसायिक तीन व्यक्तींना घेऊन आला. त्यांनी नव्या घरी सामान नेले. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी सामानाची तपासणी करत असताना मेहता यांना प्रवासी बॅगेतील ६ लाख ८० हजारांचे दागिने गायब झाल्याचे आढळले. त्यानंतर सामानाचे स्थलांतर करणाऱ्यांशी संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांचा नंबरही बंद येत होता. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे मेहता यांच्या लक्षात आले. त्यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सायन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३ (५) तसेच ३०५ (अ)अन्वये सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामान वाहतूकदारांकडून फसवणुकीच्या वाढत्या घटना
घरगुती सामानाची वाहतूक करणाऱ्या (मूव्हर्स ॲण्ड पॅकर्स) अनेक खासगी कंपन्या आहेत. ते शुल्क आकारून सामानाची वाहतूक करतात. मात्र त्यांच्याकडूनच फसवणूक करण्याचे, सामानातील मौल्यवान दागिने लंपास करण्याच्या घटना वाढत आहेत. अशा प्रकारची मौल्यवान ऐवज लंपास करण्याची ही दुसरी घटना आहे.
वांद्रे येथील एका महिलेच्या घरातील सामान लोणावळ्यात नेताना वाहतूक सेवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी १६ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारला होता. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कंपनीच्या ४ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे असे काम देण्यापूर्वी कंपनीची पूर्ण माहिती घ्यावी आणि मगच व्यवहार करावा, आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.