केंद्रात सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग, महाराष्ट्रात विनोद तावडे, पंकजा मुंडे, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या विरोधात गैरव्यवहारांचे विविध आरोप झाल्याने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केली. पंकजा मुंडे यांच्या खात्यातील खरेदीची सीबीआय चौकशीची मागणी करतानाच, दरकरारानुसार आघाडी सरकारच्या काळातील खरेदीची चौकशी करावी, अशी भूमिका मांडली.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पृथ्वीराज चव्हाण फारसे सक्रिय नव्हते. पण आता त्यांनी भाजप सरकारला लक्ष्य करीत आक्रमक भूमिका घेतली आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पदवीचा घोळ झाला आहे. अभियांत्रिकी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांना चार वर्षे मेहनत घ्यावी लागते. तावडे यांना सहजासहजी पदवी मिळाल्याने युवकांमध्ये कोणता संदेश गेला आहे. केंद्र आणि राज्यातील शिक्षणमंत्र्यांच्या पदवीचा घोळ असल्याने त्यांच्याकडून शिक्षणाच्या संदर्भात अपेक्षा करणेच चुकीचे असल्याचे चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पंकजा मुंडे यांच्या खात्याने एका दिवसात २०६ कोटींची खरेदी केली. खरेदीला कोणाचा आक्षेप असणार नाही, पण त्यासाठी नियमांचे पालन झाले नाही. ई-निविदेच्या माध्यमातूनच तीन लाखांवरील खरेदी करण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. आमच्या सरकारने दहा लाख रुपयांची मर्यादा ठेवली होती. ती फडणवीस सरकारने तीन लाखांपर्यंत कमी केली. असे असतानाही खरेदीकरिता मुंडे यांच्या खात्याने दरकराराचा का वापर केला, असा सवालही त्यांनी केला.
कर्जमुक्ती हवी
पूर्ण कर्जमुक्तीशिवाय शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही. केंद्र व राज्य सरकारने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यूपीए सरकारने शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आता दीड लाख कोटींची आवश्यकता लागेल, पण हे कर्ज माफ करावे अशी मागणी चव्हाण यांनी केली. साोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काँग्रेस हा प्रश्न लावून धरणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीकरिता कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. काँग्रेस आघाडी सरकारने दिलेल्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला होता, असा दावा चव्हाण यांनी केला.
मोठय़ा उद्योगांची अनुत्पादक कर्जाची रक्कम (एनपीए) सुमारे चार लाख हजार कोटी असताना ही रक्कम वसूल करण्याकरिता काहीच प्रयत्न होत नाहीत. भविष्यात मोठय़ा बँका अडचणीत येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दौऱ्याचे फलित सांगा !
परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरिता परदेश दौऱ्यास कोणाचाच आक्षेप असणार नाही. पण या दौऱ्यांमुळे किती गुंतवणूक महाराष्ट्रात आली याचा खुलासा करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2015 रोजी प्रकाशित
जेथे सत्ता, तेथे गैरव्यवहार!
केंद्रात सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग, महाराष्ट्रात विनोद तावडे, पंकजा मुंडे,

First published on: 08-07-2015 at 04:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exposed the true face of the bjp says prithviraj chavan