Fadnavis talks with amit Shah border issue on vehicles Karnataka attacks Urgently to stop ysh 95 | Loksatta

सीमाप्रश्नावर फडणवीस यांची शहांशी चर्चा

महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये होत असलेले हल्ले तातडीने थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.

सीमाप्रश्नावर फडणवीस यांची शहांशी चर्चा
देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मुंबई : महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये होत असलेले हल्ले योग्य नाहीत. ते तातडीने थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. सीमाभागात राज्यातील वाहनांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून बुधवारी चर्चा केली. यासंदर्भात फडणवीस म्हणाले, शहा यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेत मी सर्व परिस्थिती मांडली आहे. मी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोललो असून त्यांनीही वाहनांवर हल्ल्याचे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन दिले आहे; पण तुम्हीही मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी बोलावे, अशी विनंती मी शहा यांना केली आहे. वाहनांवर हल्ल्याचे प्रकार दोन्ही राज्यांमध्ये होणे चुकीचे आहे. हे तातडीने थांबवावे, अशी विनंती मी शहा यांना केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

..तर आम्ही रस्त्यावर उतरू -बावनकुळे

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चिथावणी किंवा आव्हान देणे बंद न केल्यास नागरिकांचा संयम सुटेल आणि भाजपही रस्त्यावर उतरेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिला. संजय राऊत यांनी वातावरण खराब करू नये आणि सामाजिक वातावरण बिघडवू नये, अन्यथा नागरिकांचा संयम सुटेल. यातून उद्या उद्रेक झाला तर थांबविता येणार नाही. कोणत्याही नेत्याचा व्यक्तिगत अपमान होईल, असे राऊत यांनी बोलू नये. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. जी २० संबंधी बैठकीस निमंत्रण असूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या हितापेक्षा अधिक महत्त्व स्वत:च्या राजकारणाला दिले व महाराष्ट्राचा अपमान केला, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 00:02 IST
Next Story
Maharashtra Karnataka Border Dispute : सीमा भागातील मराठी माणसांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे?; सर्वपक्षीय बैठकीची बाळासाहेब थोरात यांची मागणी