मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानंतर बँकेत १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन महाव्यवस्थापक व लेखा विभागाचा प्रमुख हितेश मेहता यांच्याविरोधात दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बँकेच्या प्रभादेवी व गोरेगाव येथील कार्यालयातील तिजोरीत ठेवलेल्या १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखाला वर्ग करण्यात आले असून याप्रकरणी ते पुढील तपास करणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी केलेल्या तक्रारीवरून शनिवारी पहाटे दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने व त्याच्या साथीदारांनी फौजदारी कट रचून त्याच्या ताब्यात देण्यात आलेल्या प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला एक नोटीस पाठवली आहे, त्यामध्ये पुढील सहा महिन्यांसाठी नवीन कर्ज देण्यावर, नवीन ठेवी स्वीकारण्यावर किंवा पैसे काढण्याची परवानगी देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात बँकेने केलेल्या काही अनियमिततेमुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले. आरबीआयने बँकेच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ठेवीदारही चिंतीत झाले आहेत.
बचत किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये, असे निर्देश बँकेची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन देण्यात आले आहेत. परंतु, आरबीआयच्या निर्देशांमध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून ठेवींवरील कर्जाची परतफेड करण्याची परवानगी आहे, अशी सूचना आरबीआयकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काहींनी शुक्रवारी बँकेच्या कार्यालयांबाहेर गर्दी केली होती. पोलिसांनीही खबरदारीचा उपाय म्हणून बँकेच्या सर्व शाखांबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. याप्रकरणात आता पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे.
© The Indian Express (P) Ltd